आयपीएलच्या दहाव्या आवृत्तीतील बुधवारी (२६ एप्रिल) होणा-या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट संघ घरच्या मैदानावर माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघाशी दोन हात करेल.
पुणे- आयपीएलच्या दहाव्या आवृत्तीतील बुधवारी (२६ एप्रिल) होणा-या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट संघ घरच्या मैदानावर माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघाशी दोन हात करेल. विजयी हॅट्ट्रिकनंतर स्मिथ आणि सहकाऱ्यांना प्रतिस्पर्धी संघाला नमवून विजयाचा ‘चौकार’ ठोकण्याची संधी आहे.
कोलकात्याने सातपैकी पाच सामने जिंकत सातत्य राखले आहे. पुण्याने वेळीच पुनरागमन करत सातपैकी पाच सामने आपल्या नावे केलेत. त्यातील तीन सलग आहेत, हे विशेष. यंदा माजी विजेता मुंबई आणि कोलकात्यालाच सलग चार विजय मिळवता आलेत. त्यांच्या पंक्तीत बसण्याची पुण्याला संधी आहे. ‘होमग्राऊंड’वर खेळत असल्याने स्टीव्हन स्मिथ आणि सहकाऱ्यांना ते शक्य आहे. मात्र प्रतिस्पर्धी तगडा आहे. सर्वच आघाडय़ांवर त्यांची कामगिरी चांगली होत आहे.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू बेन स्टोक्स आणि सलामीवीर अजिंक्य रहाणेला गवसलेला सूर पुण्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. त्यातच सलामीवीर राहुल त्रिपाठी, कर्णधार स्टीव्हन स्मिथने फलंदाजीत चांगले योगदान दिले आहे. कोलकात्याची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे.
कर्णधार गौतम गंभीरसह रॉबिन उथप्पा, नवा सलामीवीर सुनील नरिनने चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाजांची कामगिरीही चांगली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने बुधवारी गहुंजे स्टेडियमवर एक चांगली लढत अपेक्षित आहे.