नववर्ष सुरू होण्याआधीच काही गोष्टींचं एकदम जोरदार मार्केटिंग सुरू होतं. या काही गोष्टींमध्ये डायरी म्हणजे रोजनिशी आलीच. नव्या वर्षात नवीन संकल्प आणि नव्या आठवणी सामावून घेणा-या डायरीच्या शोधात तुम्ही असाल तर डायरीत काय वेगळं आलंय हे पाहायलाच हवं.
दिवसभरात काय काय घडलं ते पानांवर शब्दरूपात उतरवायला काही जणांना आवडतं, प्रत्येक दिवशी रोजनिशी लिहिणारे काही जण आहेत किंवा काही जणांना येणा-या वर्षात आपण काय संकल्प करणार आहोत ते लिहून ठेवायलाही आवडतात. अर्थात या आठवणी लिहून ठेवण्यासाठी एक सुंदर, आकर्षक किंवा महागडी डायरी हवी असं काही नसतं. पण हल्ली काही गोष्टींचं मार्केटिंग अशा प्रकारे केलंय की त्या आपल्याकडे नसतील तर काहीच नाही असं काहीसं होतं. त्यामुळे मार्केटमध्ये नववर्षाच्या निमित्ताने प्रत्येकांचा वयोगट लक्षात घेता काही डायरी आल्या आहेत.
ए हल्ली हल्ली डायरीमध्ये एक नवा प्रकार आलाय तो म्हणजे ‘हँडमेड डायरी’चा. सुरुवातीला खास विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ठरावीक ठिकाणी या डायरीज मिळायच्या. या डायरीजच्या कव्हरपासून ते त्यातल्या पानांपर्यंत सगळंच हँडमेड असतं. त्यामुळे या डायरीने अनेकांना आकर्षित केलंय. भले कोणाला डायरी लिहिण्याची सवय नसेल, पण आपल्याकडे ही हँडमेड डायरी असायलाच हवी, असं बहुतेकांना वाटत असल्यामुळे या डायरींचा खपही वाढला. प्रदर्शनातही यात राजस्थानी, गुजराथी कलाकुसर केलेल्या डायरीजना मागणी आहेत. या प्रकारच्या डायरीजची किंमत ३०० रुपयांपासून सुरू होते.
ए डायरीत आपण एखादी गोष्ट लिहिली आणि नकळत, किंवा मुद्दामहून ती कोणी वाचली तर काय होईल? म्हणून अनेक जण डायरी लिहायला घाबरतात. पण आता अशांसाठी ‘क्रिंज’ हा डायरीचा नवा प्रकार बाजारात आला आहे. या डायरीजना कुलूप किंवा कोड लॉक असतं. या डायरीची चावी फक्त तुमच्याकडेच राहील. जेणेकरून कोणीही कितीही प्रयत्न केला तरी या डायरीतला मजकूर ते वाचू शकणार नाहीत. या डायरीज सुरुवातीला महाग होत्या; पण हळूहळू या डायरीची क्रेज आणि मागणी लक्षात घेता या कमी किमतीतही उपलब्ध आहेत.
ए त्याचप्रमाणे किशोरवयातील मुलांसाठी ‘पासवर्ड डायरीज’ आल्या आहेत. या पासवर्ड डाय-या एका बॉक्समध्ये असतात आणि हा बॉक्स पासवर्डशिवाय उघडू शकत नाही. या डायरीजना व्हॉइस डिटेक्शन किंवा थम्ब इंप्रेशनचाही पर्याय आहे. त्यामुळे मुलांच्या आवाजाशिवाय किंवा बोटांच्या ठशाशिवाय या डायरी कोणीही उघडून पाहू शकत नाही. या डायरीजची किंमत ५०० ते ५००० रुपयांपर्यंत आहे.
ए १५ वर्षाखालील मुलांना डायरी लिहिण्याची फारशी सवय नसते. पण म्हणतात ना आकर्षक जाहिराती गरज नसतानाही एखादी गोष्ट घ्यायला ग्राहकाला भाग पाडतात. मोठमोठय़ा खेळण्यांच्या कंपन्यांनी खास मुलांसाठी डायरीज बनवल्या आहेत. विशेषत: त्यांच्या आवडीच्या कार्टुन कॅरेक्टरच्या आणि रंगीबेरंगी चित्रांच्या प्रिंट्स या डायरीजवर आहेत. लहान मुलांसाठी याची पानंही रंगीत ठेवली आहेत. काही डायरीजचं कव्हर थ्रीडीमध्येही ठेवलं आहे.
ए काही मुलींना कविता,शेरो-शायरी लिहायला आवडतात. त्यामुळे त्या लिहून ठेवण्यासाठी फुलांनी भरलेली, नक्षीकाम केलेली किंवा गुलाबी रंगातल्या डायरीच्या शोधात मुली नेहमी असतात. या मुलींसाठी खास ‘गर्ल डायरी’ नावाचा वेगळा प्रकार तयार करण्यात आला आहे. या डायरीजचं डिझाईन खास मुलींसाठी करण्यात आलं आहे.
ए कॉर्पोरेट लोकांसाठी नेहमीप्रमाणे ‘लेदरच्या डायरीज’ उपलब्ध आहेत. पण लेदरच्या डायरीज म्हटल्या की त्या काळ्या किंवा तपकिरी रंगात असायच्या. पण हल्ली वेगवेगळ्या रंगांत लेदरच्या डायरीज दुकानात उपलब्ध आहेत. कॉर्पोरेट किंवा बिझनेस युजसाठी या डायरी असल्यामुळे त्यात वेगवेगळ्या प्रकारची माहितीही दिली गेली आहे.
ए आपल्याकडे अशी डायरी असावी की जी कोणाकडेच नसेल अशा विचारांचे जे असतील त्यांच्यासाठी अँटिक डायरीचा पर्याय बेस्ट आहे. या डायरीच्या नावातच सगळं काही आहे. याची डिझाईन आणि यावरचं एम्बॉसिंगही खूप वेगळं आहे. पण या अँटिक डायरी शोधण्यासाठी मात्र तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील, हे मात्र नक्की. हल्ली काही संकेतस्थळावरही या डायरी उपलब्ध आहेत.