माजी न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांच्यावर केलेले आरोप ताजे असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका न्यायमूर्तींवर एका प्रशिक्षणार्थी महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली- माजी न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांच्यावर केलेले आरोप ताजे असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका न्यायमूर्तींवर एका प्रशिक्षणार्थी महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय न्याय शास्त्र विद्यापीठात शिकलेल्या माजी प्रशिक्षणार्थी महिलेने सरन्यायाधीश पी सतशिवम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
मे २०११ मध्ये ती प्रशिक्षणार्थी म्हणून त्या न्यायाधीशांकडे न्याय शास्त्राचे शिक्षण घेत होती, त्यावेळी न्यायाधीशांनीच दोन वेळा शोषण केल्याचा आरोप या प्रशिक्षणार्थी महिलेने केला आहे. शोषण होत असल्याने या महिलेने शिक्षणही अर्धवट सोडले. याबाबत तिने आपल्या जवळच्या मित्रांशी आणि कुटूंबातील लोकांशी चर्चा केली.
तसेच गांगुली प्रकरणात होत असलेल्या घडामोडी आणि पिडित महिलेला मिळणारा प्रतिसाद पाहून तिने याप्रकरणी एक महिन्यापूर्वीच सरन्यायाधीश पी सतशिवम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी योग्य दखल घेऊन चौकशी करुन योग्य न्याय देण्यात येईल, असे आश्वासन या महिलेला सरन्यायाधीशांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.