सॅमसंगने नुकताच न तुटणारा आणि लवचिक असणारा डिस्प्ले तयार केला असून, याला लवकरच स्मार्टफोन्समध्ये वापरले जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले हा सर्वात महत्त्वाचा घटक म्हटला जातो. यामुळे लोकप्रिय मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचा डिस्प्ले हमखास असतो. हा स्क्रीन जास्त पिक्सल्सचा असून यावरील चित्र सजीव वाटावेत, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. याचसोबत हा डिस्प्ले मजबूत असणेही तितकेच आवश्यक असते. यामुळे अलीकडच्या काळात मजबूत डिस्प्ले देण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल आहे.
या पार्श्वभूमीवर, सॅमसंग कंपनीने नुकताच सादर केलेला डिस्प्ले हा अतिशय अनोखा असाच मानावा लागणार आहे. जगभरात सॅमसंग कंपनीने तयार केलेले डिस्प्ले मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. या पार्श्वभूमीवर, या कंपनीने अमेरिकेतील अंडररायटर्स लॅबोरेटरीच्या मदतीने नवीन डिस्प्ले तयार केला आहे. हा ओएलईडी या प्रकारातील आहे. तो प्रचंड मजबूत असून वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफदेखील आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तो न तुटणारा तर आहेच, पण तो लवचिकदेखील आहे. अर्थात, त्याला एखाद्या लवचिक वस्तूप्रमाणे हवा तो आकार देता येणार आहे.
हा डिस्प्ले अमेरिकन सैन्यासाठी तयार करण्यात येणा-या उपकरणांच्या मानकानुसार उत्पादित करण्यात आलेला आहे. यावर चार मीटर उंचावरून पाण्याचे थेंब पडले तरीही, तो खराब होणार नाही. तो उंचावरून पडूनही तुटणार नाही. विशेष म्हणजे तो ७३ अंश ते उणे ३२ अंशांपर्यंतच्या पराकोटीच्या विषम वातावरणातही सहज वापरता येणार आहे. यामुळे हा डिस्प्ले आगामी काळात मजबूत उपकरणांच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात अर्थातच सर्वाधिक लोकप्रिय उपकरण हे स्मार्टफोन असेल हे नक्की.