खालापूर तालुक्यातील वनवेवाडी येथील बारकी भोईर (३५) यांच्या पोटातील १६ किलो वजनाची गाठ काढण्यात अलिबागमधील डॉक्टरांना यश आले.
अलिबाग – खालापूर तालुक्यातील वनवेवाडी येथील बारकी भोईर (३५) यांच्या पोटातील १६ किलो वजनाची गाठ काढण्यात अलिबागमधील डॉक्टरांना यश आले. सोमवारी या महिलेवर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
साधारण एक वर्षापूर्वीच या महिलेला या गाठीचा त्रास जाणवू लागला होता. गाठीचा आकार वाढत गेल्याने तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने उपचार होत नव्हते. अशा अवस्थेतच ही महिला शेतातील अंगमेहनतीची कामे करीत होती. अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयातील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिल फुटाणे यांनी या महिलेची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. सुनील पाटील आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. सुधाकर बडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारकी यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. दीड तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ४ दिवसांनी या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साधारणत: अशा केसेसमध्ये ५ ते ७ किलो वजनाच्या गाठी आढळतात, परंतु १६ किलो वजनाची गाठ काढण्याचा हा दुर्मीळ प्रसंग असल्याचेही या वेळी डॉक्टरांनी सांगितले.