जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला बुधवारी अलेखाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत इस्रयलच्या बोरिस गेलफॅँडविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवावा लागला.
सेंट पीटर्सबर्ग – जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला बुधवारी अलेखाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत इस्रयलच्या बोरिस गेलफॅँडविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवावा लागला. या बरोबरीमुळे आनंदचे स्पर्धेतील जेतेपद हुकले.
आनंद आणि गेलफॅँड यांच्यातील लढतीत ४० चालींनंतर बरोबरी मान्य करण्यात आली. काळी मोहरी घेऊन खेळताना आनंदने अॅँटी-निम्झो-इंडियन पद्धतीचा अवलंब केला. दोघांनी वेगात खेळण्याला प्राधान्य दिले. मात्र त्यांना बरोबरीवर समाधान मानले. आनंद आणि गेलफॅँड यांच्यात गेल्यावर्षी झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीतील १२ पैकी १० डावही बरोबरीत सुटले होते.
पुन्हा एकदा दोघांमधील बरोबरीची कोंडी फुटली नाही. अन्य लढतींत आर्मेनियाच्या लेवॉन अरोनियनने फ्रान्सच्या मॅक्सिम-वॅशियर-लॅग्रेवला ४२ चालींमध्ये नमवले. याबरोबरच गेलफॅँड आणि अरोनियन यांचे समान साडेपाच गुण झाले. नवव्या फेरीतील अन्य निकालांमध्ये रशियाचा पीटर स्विडलर आणि फ्रान्सचा लॉरेंट फ्रेसिनेट यांच्यातील डावातही ४० चालींमध्ये बरोबरी मान्य करण्यात आली. रशियाचा निकिता विटियुगोव आणि चीनचा लिरेन डिंग यांनीही ४० चालींमध्ये बरोबरी मान्य केली.