बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या १२ डावांच्या लढतीतील सोमवारी सातवा डाव खेळण्यात येईल. लढतीच्या या उर्वरीत टप्यातील सातवा डाव आनंदसाठी अतिशय महत्वाचा आहे.
सोची (रशिया) – बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या १२ डावांच्या लढतीतील अर्धा टप्पा शनिवारी संपला. त्यात आव्हानवीर विश्वनाथन आनंदकडे एका गुणाची (२.५) पिछाडी होती. याउलट कार्लसनने पुन्हा जगज्जेतेपद राखण्याच्यादृष्टीने ३.५ गुण नोंदवत आघाडी घेतली. रविवारी विश्रांतीचा दिवस होता. मात्र सोमवारी सातवा डाव खेळण्यात येईल. लढतीच्या या उर्वरीत टप्यातील सातवा डाव आनंदसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण या डावात तो पराभूत झाल्यास कारकीर्दीत सहाव्यांदा जगज्जेतेपद पटकवण्याची आनंदची धडपड धोक्यात येऊ शकते. त्यातच आनंदला सातवा डावही काळ्या मोह-यांनिशीच खेळायचा आहे. ते पाहता आनंदला स्पर्धेत रंगत राखण्यासाठी सातवा डाव जिंकणे गरजेचे आहे. मात्र काळ्या मोह-यांनिशी खेळताना विजय मिळवणे आनंदला सोपे नाही. त्यातच कार्लसन करत असलेल्या चुकांचाही तो फायदा घेऊ शकत नसल्याचे शनिवारी झालेल्या सहाव्या डावातून दिसले. याउलट कार्लसनने चुका केल्यावर आनंद आणखीनच घोडचुका करत आहे.
दोघांमधील गेल्यावर्षीच्या जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिल्या सहा डावांमधील स्थितीपेक्षा यंदा आनंदची पिछाडी कमी आहे. मात्र लढतीच्या या अध्र्या टप्यावर पराभव पत्करणे जगज्जेतेपदाला मुकल्यासारखे आहे. गेल्यावर्षी चेन्नई येथे कार्लसनने आनंदला संधीच दिली नव्हती. यंदा कार्लसन गेल्यावषीप्रमाणे फॉर्मात नाही. त्यातच तो पटलावर चुकाही करत आहे. मात्र तरीदेखील आनंद त्याचा फायदा घेऊ शकत नाही ही आनंदच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बाब आहे. ‘‘जेव्हा तुम्हाला सहज विजय मिळेल याची शक्यता नसते तेव्हा त्या चुकांकडे पाहिलेच जात नाही,’’ अशी पराभवानंतर आनंदने दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते.
आनंदकडे मोठा अनुभव आहे जो त्याने यावर्षी कॅँडिडेट्स स्पर्धा जिंकून जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरवत दाखवून दिला. खुद्द आनंद पुन्हा आव्हानवीर असेल असे कार्लसनलाही वाटले नव्हते. आता पुन्हा एकदा उर्वरित सहा डावांमध्ये आनंदच्याच अनुभवाची कसोटी लागणार आहे. कारण जसजसे कार्लसन विजय मिळवेल तसतशी लढतीतील उत्कंठता संपत जाणार आहे. या लढतीत पहिल्या पाच डावांत आनंदने काही चुका केल्या असल्या तरी योग्य बचावही केला. सहाव्या डावात मात्र त्याच्या चुकाच होत राहिल्या आणि ते बघवले नाही, अशा शब्दांत भारताच्या काही ग्रॅँडमास्टरसनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिल्या. त्यातच कार्लसनने आतापर्यंत तीन वेळा पांढ-या मोह-यांनी खेळताना दोन वेळा विजय मिळवला आहे. एकदाच बरोबरी त्याने मान्य केली. यास्थितीत कार्लसन पांढऱ्या मोह-यांनी खेळताना किती ‘स्ट्रॉँग’ आहे हे दिसते. आता आनंदसमोर सातव्या डावात एकच मार्ग आहे तो म्हणजे सर्वाधिक संधींचा त्याने फायदा घेणे. कारण कार्लसन संधी एकदाच देतो आणि मग मात्र कसे ‘कमबॅक’ करतो हे सहाव्या डावात दिसले.