आमंत्रण बिल्डरचे योगेश जाधव, मानसी, साईट इन्चार्ज अन्वर शेख आणि आरपीएल अकाऊंट पॅनल यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण – स्वस्त घराचे आमिष दाखवून तब्बल ६० जणांची फसवणूक करून सुमारे ५५ लाखांला गंडा घालणा-या आमंत्रण बिल्डरचे योगेश जाधव, मानसी, साईट इन्चार्ज अन्वर शेख आणि आरपीएल अकाऊंट पॅनल यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डरने फसवणूक केलेला या वर्षातील हा अकरावा प्रकार आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील गावदेवी सोसायटीत राहणारे गणेश शिंदे यांनी ५९ जणांच्या वतीने हा गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पश्चिमेतील ओक बाग येथील सिद्धिविनायक व्यापारी संकुलात आमंत्रण बिल्डरने कार्यालय थाटले होते. नेवाळी परिसरात स्वस्त घराची जाहिरात करण्यात आली होती. स्वस्त घराच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी रोख रक्कम व धनादेशाद्वारे बुकिंग केले होते,
मात्र बिल्डरने पैसे भरूनही घर मिळत नसल्याने रहिवाशांनी बिल्डरच्या कार्यालयावर धाव घेतली, त्या वेळी बिल्डरने कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यांनी केली फसवणूक
आकृती, श्री साई एकविरा, एव्हरेस्ट, ओमसाई, रिद्धी-सिद्धी, गजानन, त्रिमूर्ती, स्वस्तिक, उमंग, ग्रीन सिटी अशा १० बिल्डरांनी यापूर्वी फसवणूक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.