मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात अभिनेता आमीर खानच्या वक्तव्यावरुन एका दाम्पत्यामध्ये झालेल्या वादात पत्नीने रागाच्या भरात आत्महत्या केली.
भोपाळ- मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात अभिनेता आमीर खानच्या वक्तव्यावरुन एका दाम्पत्यामध्ये झालेल्या वादात पत्नीने रागाच्या भरात आत्महत्या केली. सोनम पांडे असे मृत महिलेचे नाव आहे.
जबलपूर शहरातील लहरी अपार्टमेंटमध्ये रहाणा-या अयंक पांडे आणि त्याची पत्नी सोनम यांच्यामध्ये आमीर खानच्या वक्तव्यावरून जोरदार वाद झाला.
या वादामुळे संतापलेल्या सोनमने रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पतीने तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
वृत्तपत्रात आलेली बातमी वाचल्यानंतर त्या दोघांमध्ये सुरुवातीला मजेमजेत आणि नंतर काहीवेळ शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर सोनम वरच्या मजल्यावर गेली आणि तिने विष घेतले. तिचा उलटी करु लागल्याचा आवाज ऐकून आम्ही वर जाऊन तिला शेजा-यांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल केले, असे सोनमचे सासरे डॉ. आर. पी. पांडे यांनी सांगितले.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.