आंबेडकर पेरियार विद्यार्थी मंडळाच्या सदस्यांनी मंगळवारी आयआयटी मद्रासच्या आवारात जोरदार आंदोलन केले.
चेन्नई – अचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन आयआयटी मद्रासने मान्यता रद्द केलेल्या आंबेडकर पेरियार विद्यार्थी मंडळाच्या सदस्यांनी मंगळवारी आयआयटी मद्रासच्या आवारात जोरदार आंदोलन केले.
यावेळी सदस्यांनी संघटनेला मान्यता पुन्हा बहाल करण्याची तसेच अधिष्ठात्याने आपल्या कृतीबद्दल माफी मागावी या मागण्या केल्या. चेन्नईमध्ये आयआयटी मद्रासच्या आवारात हाती घोषणाफलक घेऊन सदस्यांनी व्यवस्थापना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी प्रसारमाध्यमांनाही आवारात जाण्याची परवानगी दिली नाही. यावरुन पत्रकारांची पोलिसांबरोबर वादावादी झाली. नियमानुसार विद्यार्थी संघटना आपल्या उपक्रमाच्या प्रसिध्दीसाठी आयआयटी मद्रासच्या नावाचा वापर करु शकत नाही असे व्यवस्थापनाने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा अपप्रचार केल्याचा ठपका ठेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशावरुन आंबेडकर पेरियार विद्यार्थी संघटनेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला एक निनावी पत्र प्राप्त झाले त्याआधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.