स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु आसाराम याला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
नवी दिल्ली– स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु आसाराम याला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आसाराम औषधे घेऊन बरे होऊ शकतात असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी न्यायालयात अहवाल सादर केला.
प्रकृती ठीक नसल्याचे सांगत आसारम याने वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्याची विनंती केली होती. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी ‘एम्स’मध्ये त्यांच्या विविध चाचण्या केल्या. या अहवालावर मत व्यक्त करताना न्यायालयाने आसारामवर शस्त्रक्रियेची गरज नाही ते औषधाद्वारे बरे होऊ शकतात असे मत व्यक्त केले.
विशेष म्हणजे याआधीच्या सुनावणी दरम्यानही न्यायालयाने वैद्यकीय कारणासाठी जामिन मंजूर केला जाणार नाही, तसेच आसारामला कोणतीही विशेष सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
बलात्कार प्रकरणी आसाराम याला ऑगस्ट २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आसाराम तुरुंगातच आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होणार आहे.