मराठी कथा लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे आणि कोकणी साहित्यविभागात एडविन जे एफ डिसोझा यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली- मराठी कथालेखनात एक वेगळी जाणीव निर्माण करणारे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोकणी साहित्यविभागात एडविन जे एफ डिसोझा यांच्या ‘काळे भांगार पुस्तकाची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारांचे वितरण २२ फेब्रुवारीला होईल.
या सन्मानाबद्दल आणि ग्रामीण कथाचित्रणाची दखल घेतली गेल्याचा आनंद लोमटे यांनी व्यक्त केला आहे. १ लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ग्रामीण जीवनाचे सशक्त चित्रण करणा-या या संवेदनशील लेखकाला हा मानाचा पुरस्कार घोषित झाल्याने मराठी साहित्यविश्वात आणि लोमटे यांच्या लेखनाच्या चाहत्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ‘इडा पीडी टळो’ हा त्यांचा कथासंग्रहही वाचकांनी वाखाणला आहे.