फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला ७ विकेट आणि १७ चेंडू राखून हरवत बुधवारी इंग्लंडने आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली.
नवी दिल्ली- फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला ७ विकेट आणि १७ चेंडू राखून हरवत बुधवारी इंग्लंडने आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली. २०१०नंतर त्यांनी ‘फायनल’ प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्याचे १५४ धावांचे आव्हान इंग्लंडने १७.१ षटकांत तीन विकेटच्या बदल्यात पार केले.
‘सुपर टेन’ फेरीतील चारही विजयानंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडचे पारडे जड होते. मात्र माजी विजेत्यांनी सर्वच आघाडय़ांवर खेळ उंचावताना प्रतिस्पर्ध्याचा विजयीरथ रोखला. हाणामारीच्या षटकात मध्यमगती गोलंदाज बेन स्टोक्सने (३ विकेट) केलेला प्रभावी मारा करताना प्रतिस्पर्ध्याना ८ बाद १५३ धावांत रोखले. त्यानंतर जेसन रॉयने (४४ चेंडूंत ७८ धावा) फटकेबाजी करताना विजयाचे सोपस्कार पूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलला.
जेसन रॉय आणि अँड्रय़ू हेल्सने ८.२ षटकांत ८२ धावांची सलामी देत इंग्लंडच्या मोठया विजयाची पायाभरणी केली. कोरी अँडरसनच्या पहिल्याच षटकात चार चौकारांसह (त्यापैकी ३ सलग) सोळा धावा फटकावताना रॉयने आपला इरादा स्पष्ट केला. त्याने अँडरसननंतर अॅडम मिल्ने, मिचेल सँटनर, मिचेल मॅकक्लेनॅघनला लक्ष्य करताना ४४ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह ७८ धावांचे योगदान दिले.
ईश सोढीने रॉय आणि कर्णधार इयॉन मॉर्गनला (०) लागोपाठच्या चेंडूंवर बाद करताना सामन्यात थोडी रंगत आणली. मात्र बटलर (१७ चेंडूंत नाबाद ३३ धावा) आणि ज्यो रूटने (२२ चेंडूंत नाबाद २७ धावा) चौथ्या विकेटसाठी नाबाद ४९ धावा जोडताना इंग्लंडला जिंकून दिले.
मुन्रोच्या फटकेबाजीनंतरही न्यूझीलंड ८ बाद १५३
नवी दिल्ली- ‘वनडाउन’ कॉलिन मुन्रोच्या (३२ चेंडूंत ४६ धावा) फटकेबाजीनंतरही टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत बुधवारी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध ८ बाद १५३ धावा केल्या.
नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणा-या इंग्लंडला वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने तिस-याच षटकात पहिले यश मिळवून दिले. त्याने सलामीवीर मार्टिन गप्टिलला (१५) लवकर माघारी धाडले.
सावध सुरुवात करणा-या केन विल्यमसनने (३२) ‘वनडाउन’ कॉलिन मुन्रोसह (४६) दुस-या विकेटसाठी ८.२ षटकांत ७४ धावांची भागीदारी रचताना न्यूझीलंडला सुस्थितीत आणले. मुन्रोने एक बाजू लावून धरताना संघाचे शतक फलकावर लावले. लियाम प्लंकेटने मोईन अलीकरवी झेलबाद करताना इंग्लंडला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. त्याने ३२ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ४६ धावा केल्या.
मुन्रोनंतर रॉस टेलर (६) आणि ल्युक राँची (३) झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडचा धावांचा वेग मंदावला. कोरी अँडरसनने (२३ चेंडूंत २८ धावा) थोडा प्रतिकार केल्याने त्यांना दीडशेपार मजल मारता आली.
इंग्लंडतर्फे मध्यमगती गोलंदाज बेन स्टोक्स (२६-३) सर्वात प्रभावी ठरला. त्याने वैयक्तिक आणि डावाच्या शेवटच्या षटकात अवघ्या तीन धावा दिल्या. शिवाय एक विकेटही घेतली. अन्य मध्यमगती ख्रिस जॉर्डन (२४-१) तसेच डेव्हिड विली (१७-१) आणि ऑफस्पिनर मोईन अलीनेही (१०-२) अचूक मारा केला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ‘डेथ ओव्हर्स’मध्ये प्रभावी मारा करताना ६४ धावा दिल्या.