इयन बेलसह ज्यो रूट आणि तळातील मोईन अलीच्या शानदार शतकांमुळे अॅशेस मालिकेतील तिस-या कसोटीत २८१ धावा करताना इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात १४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
बर्मिगहॅम – इयन बेलसह ज्यो रूट आणि तळातील मोईन अलीच्या शानदार शतकांमुळे अॅशेस मालिकेतील तिस-या कसोटीत २८१ धावा करताना इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात १४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
दुस-या दिवशी ३ बाद १३३ धावांवरून पुढे खेळताना यजमानांच्या उर्वरित ७ फलंदाजांना आणखी १४८ धावांची भर घालता आली. त्यात रूट (६३) आणि मोईनचे (५९) मोलाचे योगदान राहिले. ५३ धावा करणारा बेल परतल्यानंतर यजमानांचा डाव कोसळला. जॉनी बेस्टरे (५) आणि बेन स्टोक्सला (०) लागोपाठच्या षटकांत यष्टिरक्षक नेविलकरवी बाद करताना मिचेल जॉन्सनने इंग्लंडची अवस्था ५ बाद १४२ धावा अशी केली. निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा केवळ ६ धावांची आघाडी असल्याने यजमान आणखी किती आघाडी घेणार, याची उत्सुकता होती. रूटने मालिकेतील दुसरे आणि एकूण १३वे अर्धशतक ठोकताना इंग्लंडच्या मोठय़ा आघाडीच्या आशा कायम ठेवल्या. त्याच्या ७५ चेंडूंतील ६३ धावांच्या झटपट खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
रूटनंतर आठव्या क्रमांकावरील अष्टपैलू मोईन अली इंग्लंडच्या मदतीला धावला. त्याने ७८ चेंडूंत ११ चौकारांसह ५९ धावा करताना इंग्लंडची आघाडी वाढवली. मोईनचे हे चौथे अर्धशतक आहे. मोईननंतर नवव्या क्रमांकावरील स्टुअर्ट ब्रॉडने ३१ धावांचे योगदान देताना यजमानांना तीनशेच्या घरात नेले. तसेच एकूण आघाडी १४५ धावांवर नेली. इंग्लंडचा डाव उपाहारानंतर तासाभरात २८१ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे वेगवान गोलंदाज जोश हॅझ्लेवुड आणि लेगस्पिनर नेथन लियॉनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनसह मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन विकेट घेताना त्यांना चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १३६ धावा करता आल्यात.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – १३६ आणि ५ बाद १०६ वि. इंग्लंड – २८१ (रूट ६३, अली ५९, बेल ५३, लियॉन ३६-३, हॅझ्लेवुड ७४-३).
ऑस्ट्रेलियाची दुस-या डावातही घसरगुंडी
पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाची दुस-या डावातही घसरगुंडी झाली. दुस-या दिवशी तिस-या सत्रात त्यांची अवस्था ५ बाद १०६ धावा अशी वाईट झाली. डावाचा मारा टाळण्यासाठी पाहुण्यांना आणखी ३९ धावांची आवश्यकता होती. वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने (४ विकेट) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हरवताना इंग्लंडला आणखी एका विजयासमीप आणले आहे. पहिल्या डावात २ धावांवर बाद झालेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (खेळत आहे ७०) एक बाजू धरली तरी ख्रिस रॉजर्ससह (६), स्टीव्हन स्मिथ (८), कर्णधार मायकेल क्लार्क (३), अॅडॅम वोग्ज (०) आणि मिचेल मार्शला (६) आल्यापावली परतावे लागले. स्मिथ, क्लार्क, वोग्ज आणि मार्शच्या विकेट फिनने घेतल्या.
विकेटचे ‘त्रिशतक’ साजरा करणारा ऑस्ट्रेलियाचा पाचवा गोलंदाज
मधल्या फळीतील जॉनी बेस्टरेला बाद करताना वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने कसोटीतील विकेटचे ‘त्रिशतक’ साजरे केले. ३३ वर्षीय जॉन्सनने ६९व्या कसोटीत ही मजल मारली. तीनशेहून अधिक विकेट घेणारा तो ऑस्ट्रेलियाचा पाचवा गोलंदाज ठरला. जॉन्सनपूर्वी ऑस्ट्रेलियातर्फे केवळ माजी लेगस्पिनर शेन वॉर्न, वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा, डेनिस लिली आणि ब्रेट ली यांनाच अशी मजल मारता आली आहे.