विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा ठेवण्यासाठी इंग्लंडला सोमवारी ‘अ’ गटात बांगलादेशविरुद्ध विजय गरजेचा आहे.
अॅडलेड- विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा ठेवण्यासाठी इंग्लंडला सोमवारी ‘अ’ गटात बांगलादेशविरुद्ध विजय गरजेचा आहे. ही लढत जिंकली तरीदेखील इंग्लंड पाचव्या स्थानीच राहणार आहे. कारण बांगलादेशचे पाच गुण आहेत याउलट इंग्लंडचे दोन गुणच आहेत. मात्र बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला तर इंग्लंडची अखेरची साखळी लढत अफगाणिस्तानविरुद्ध आहे. यास्थितीत उर्वरित दोन लढतींत विजय मिळवून चौथे स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठणे हा एकमेव मार्ग इंग्लंडसमोर आहे. याउलट बांगलादेशने ही लढत गमावली तर अखेरच्या साखळी लढतीत त्यांना विजयाची अपेक्षा करणे कठीण आहे. कारण बांगलादेशची अखेरची साखळी लढत बलाढय़ सहयजमान न्यूझीलंडशी आहे. यास्थितीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे हा एकमेव मार्ग बांगलादेशसमोर आहे. कारण जर ही लढत बांगलादेशने जिंकली तर इंग्लंड गटवार साखळीत गारद होईल हे निश्चित. त्यातच गेल्या विश्वचषकात इंग्लंडला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता ही बांगलादेशसाठी जमेची बाजू आहे.
इंग्लंडला यंदा चार लढतींमधून एकमेव विजय मिळवता आला आहे तोदेखील स्कॉटलंडविरुद्ध. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या कसोटी खेळणा-या देशांविरुद्ध इंग्लंडला पराभव पत्करावे लागले आहेत. इंग्लंड यंदा सर्व पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. फलंदाजी किंवा गोलंदाजी या दोन्ही पारडय़ांवर सातत्य राखण्यात इंग्लंडला अपयश येत आहे. मोईन अली आणि ज्यो रुट यांनी या विश्वचषकात शतके झळकवली असली तरी त्यांच्या कामगिरीतही सातत्य राहिलेले नाही. जेम्स अॅँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या वेगवान दुकलीला विकेट घेण्यातही अपयश येत आहे. इतकेच नाही तर धावांनाही ते रोखू शकत नाहीत.
याउलट बांगलादेशला यंदा फायदा मिळाला तो त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्याने (एक गुण मिळाला). त्यातच श्रीलंकेकडून पराभव झाला असला तरी अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडवर त्यांनी मात केली. स्कॉटलंडचे तर ३१९ धावांचे आव्हान बांगलादेशने ११ चेंडू राखून पार केले. मात्र आता बांगलादेशला उणीव भासेल ती दुखापतग्रस्त फलंदाज अनामूल हकची. मात्र बांगलादेशच्या अन्य फलंदाजांचा फॉर्म पाहता इंग्लंडसाठी ही लढत सोपी नसेल हे निश्चित आहे.
वेळ : सकाळी ९वा.
बांगलादेश- मश्रफे मोर्ताझा (कर्णधार), अल-अमिन हुसेन, अराफत सनी, महमदुल्ला, मोमिनुल हक, मुशफिकूर रहिम (यष्टिरक्षक), नासिर हुसेन, रुबेल हुसेन, सब्बीर रहमान, शाकीब-अल हसन, सौम्य सरकार, तायजुल इस्लाम, तमिम इक्बाल, तस्कीन अहमद.
इंग्लंड- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), मोईन अली, जेम्स अॅँडरसन, गॅरी बॅलन्स, इयन बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीवन फिन, अॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, ज्यो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स