टी-२० वर्ल्डकपच्या सुपर टेन फेरीतील (ग्रुप १) महत्त्वपूर्ण लढतीत शनिवारी (२६ मार्च) इंग्लंडसमोरगतविजेत्या श्रीलंकेचे आव्हान आहे.
नवी दिल्ली – टी-२० वर्ल्डकपच्या सुपर टेन फेरीतील (ग्रुप १) महत्त्वपूर्ण लढतीत शनिवारी (२६ मार्च) इंग्लंडसमोरगतविजेत्या श्रीलंकेचे आव्हान आहे. इयॉन मॉर्गन आणि सहका-यांना ही लढत जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याची संधी आहे.
अननुभवी अफगाणिस्तानला हरवून इंग्लंडने आव्हान कायम ठेवले चुकांमधून त्यांना बोध घ्यावा लागेल. अफगाणिस्तानविरुद्ध आघाडी फळी कोसळली. तळातील अष्टपैलू मोईन अली मदतीला धावून आला नसता तर त्यांच्यावर फार मोठी नामुष्की ओढवली असती. फिरकी गोलंदाजी खेळणे, इंग्लंडच्या फलंदाजांना जड जातेय. त्यातच फिरोजशा कोटलाची खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरते. त्यामुळे शनिवारी श्रीलंका संघ किमान दोन स्पिनर्ससह (रंगना हेरथ आणि जेफ्री व्हँडेर्से) खेळेल.
स्पिनर्सच्या किमान आठ ओव्हर्स खेळून काढताना फलंदाजी कशी उंचवायची, यासाठी इंग्लंड संघ वेगवेगळय़ा योजना बनवत आहे. माजी विजेत्यांची फलंदाजीची भिस्त ज्यो रूटवर आहे. त्याच्याहसह जेसन रॉय आणि अष्टपैलू मोईन अली वगळता अन्य प्रमुख फलंदाजांनी निराशा केली आहे. फलंदाजीच्या तुलनेत इंग्लंडची गोलंदाजी मात्र प्रभावी ठरली आहे. ऑफस्पिनर मोईन अली आणि लेगस्पिनर अदिल रशिद तसेच मध्यमगती गोलंदाज डेव्हिड विलीने अचूक मारा केला आहे. मात्र ख्रिस जॉर्डन आणि बेन स्टोक्सचे अपयश त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. विक्रमवीर सचिन तेंडुलकरने उपांत्य फेरीसाठी ‘फेवरिट’ म्हटल्याने इंग्लंड क्रिकेटपटूंची जबाबदारी वाढली आहे.
गतविजेता श्रीलंकेला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दोन लढतींमध्ये त्यांना एक विजय मिळवता आला आहे. अफगाणिस्ताला हरवले तरी ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजकडून पराभूत व्हावे लागले. इंग्लंडनंतर दक्षिण आफ्रिकेशी त्यांना दोन हात करावे लागतील. दोन्ही संघ कडवे प्रतिस्पर्धी असल्याने अँजेलो मॅथ्यूज आणि सहका-यांचा कस लागेल. फलंदाजीत एकटय़ा तिलकरत्ने दिलशानला सातत्य राखता आलेले आहे. त्याला थिसरा परेराची थोडी फार चांगली साथ लाभली तरी लहिरु थिरिमने, चामरा कपुगेदरा आणि दिनेश चंडिमलने निराशा केली आहे.
प्रतिस्पर्धी इंग्लंडची प्रभावी गोलंदाजी पाहता श्रीलंकेच्या फलंदाजांचा कस लागेल. श्रीलंकेच्या गोलंदाजीतही आलबेल नाही. नियोजित कर्णधार आणि वेगवान गोलंदाज लसित चंडिमलची त्यांना अनुपस्थिती जाणवतेय. कर्णधार मॅथ्यूजसह दुशमंत चमीरा, नुवान कुलसेकरा तसेच स्पिनर रंगना हेरथ आणि जेफ्री व्हँडेर्सेला अद्याप सूर गवसलेला नाही.
न्यूझीलंडला विजयाचा ‘चौकार’ शक्य
कोलकाता – ‘सुपर टेन’ फेरीतील ‘ग्रुप २’मध्ये शनिवारी ढेपाळलेल्या बांगलादेशला हरवून न्यूझीलंडला विजयाचा ‘चौकार’ लगावणे शक्य आहे.
सलग तीन सामने जिंकून उपांत्य फेरी निश्चित करणा-या न्यूझीलंडचे बांगलादेशविरुद्ध पारडे जड आहे. सर्वच आघाडय़ांवर त्यांची कामगिरी बहरली आहे. मात्र विजयाच्या हॅट्ट्रिकमध्ये (फिरकी) गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने सर्वाधिक ८ विकेट घेत आपली छाप पाडली. त्याच्यासह भारतीय वंशाचा स्पिनर ईश सोढी (५ विकेट) तसेच अॅडम मिल्ने आणि मिचेल मॅकक्लेनॅघनने चांगला मारा केला आहे. गोलंदाजांना फलंदाजांची चांगली साथ लाभली आहे. सलामीवीर मार्टिन गप्टिलने फॉर्म कायम राखला आहे.
त्याला रॉस टेलर, कोरी अँडरसन आणि ग्रँट इलियटची सुरेख साथ मिळाली आहे. उपांत्य फेरी दिमाखात गाठल्याने विजयाचा ‘चौकार’ ठोकण्याची संधी न्यूझीलंडला चालून आली आहे.
वनडे वर्ल्डकप आणि आशिया चषकात चमकदार कामगिरी करणा-या बांगलादेशने ‘सुपर टेन’ फेरीत निराशा केली. भारताविरुद्ध छान खेळले तरी तिस-या लढतीनंतरही त्यांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. चौथ्या आणि अंतिम लढतीत त्यांच्यासमोर तगडा प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे त्यांचा कस लागेल. सलामीवीर तमिम इक्बालचे सातत्य तसेच शाकीब-अल-हसनचा अष्टपैलू खेळ ही बांगलादेशसाठी जमेची बाजू असली तरी अन्य प्रमुख फलंदाज आणि गोलंदाजांनी निराशा केली. त्यातच मिळालेल्या संधीचे सोने करण्यात त्यांना अपयश आले. ‘झाले गेले विसरून’ किमान शेवट ‘गोड’ करण्यासाठी मश्रफे मोर्ताझा आणि सहकारी उत्सुक असले तरी फॉर्मात असलेल्या प्रतिस्पध्र्याना रोखणे, तितके सोपेही नाही.
आजचे सामने (सुपर टेन फेरी)
ग्रुप २
न्यूझीलंड वि. बांगलादेश (कोलकाता)
वेळ : दु. ३ वा.
ग्रुप १
इंग्लंड वि. श्रीलंका (दिल्ली)
वेळ : सायं. ७.३० वा.