अटीतटीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवून आयपीएलच्या सातव्या हंगामाचे जेतेपद पटकावणा-या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मंगळवारी इडन गार्डन्सवर भव्य सत्कार होणार आहे.
कोलकाता – अटीतटीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवून आयपीएलच्या सातव्या हंगामाचे जेतेपद पटकावणा-या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मंगळवारी इडन गार्डन्सवर भव्य सत्कार होणार आहे.
पश्चिम बंगाल सरकार आणि बंगाल क्रिकेट संघटनेने हा सत्कार सोहळा आयोजित केला असून, सोमवारी दुपारी होणा-या बैठकीत कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. इडन गार्डन हे केकेआरचे घरचे मैदान आहे.
केकेआरच्या चाहत्यांना या सत्कार सोहळयात सहभागी होता यावे यासाठी इडन गार्डनवर विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी ११.३० ते ३.३० या वेळेत इडन गार्डनवर प्रवेश दिला जाईल. विजयी संघाची भव्य मिरवणूक काढण्याची आमची योजना असून, हा विजय दुप्पट संस्मरणीय करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे कॅबचे सहसचिव सुबीर गांगुली यांनी सांगितले.
२०१२ मध्ये आयपीएलच्या पाचव्या हंगामाचे जेतेपद पटकावल्यानंतर केकेआर संघाचा असाच भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजेत्या संघाला सुवर्ण पदक आणि सोन्याची चैन देऊन सन्मानित केले होते. त्यावेळी त्यांच्या या निर्णयावर चौफेर टीका झाली होती.