देशातील दुस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी इन्फोसिसने ३० सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ३,३९८ कोटी रुपयांच्या नफ्याची कमाई केली आहे.
बंगलोर- देशातील दुस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी इन्फोसिसने ३० सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ३,३९८ कोटी रुपयांच्या नफ्याची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ९.८ टक्के वाढ झाली आहे. २०१४-१५ या वर्षात या तिमाहीत कंपनीने ३,०९६ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.
मात्र घटलेल्या महसुली अंदाजाने ही कामगिरी झाकोळली. प्रमुख बाजारपेठांत माहिती-तंत्रज्ञानावरील खर्चाबाबत उदासीनता असून मजबूत डॉलरमुळे चिंतित ग्राहकांकडून सावध पावले टाकली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने चालू वर्षाचा डॉलरमधील महसुली अंदाज ७.२ ते ९.२ टक्क्यांवरून ६.४ टक्के ते ८.४ टक्क्यांपर्यंत घटवतानाच पुढचे सहा महिने आव्हानात्मक असल्याचे संकेत दिले.
फिलिप्सचे माजी अधिकारी क्रिश शंकर यांची जागतिक मनुष्यबळ अधिकारी म्हणून नेमणूक केली असून सहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते. दुस-या तिमाहीत कंपनीच्या महसुलामध्ये १७.२ टक्के वाढ होऊन १५,६३५ कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे. गेल्या वर्षी कंपनीला या तिमाहीत १३,३४२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
नफा आणि महसुलामध्ये चांगली वाढ दिसत असली तरी या वर्षी डॉलर महसुलात ६.४ टक्के ते ८.४ टक्के वाढीचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. ग्राहकांकडून डॉलरमधील मजबुतीच्या पार्श्वभूमीवर माहिती-तंत्रज्ञानावरील खर्चासाठी हात आखडता घेण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
महसुली अंदाजातील कपातीबाबत नेमके कारण स्पष्ट केले गेले नसले तरी इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होत असलेला डॉलर हे यामागे कारण असल्याचे मानले जात आहे. विविध कंत्राटांची संख्या चांगली आहे. कंपनीला एक अब्ज डॉलर मूल्याचे कंत्राट मिळाले असून ही आतापर्यंतचे सर्वोत्तम कामगिरी आहे.
कंपनी चांगली प्रगती करत असून ‘न्यू अँड रिन्यू’ या धोरणातील प्रवासाची ही सुरुवात आहे. एकूणच ही तिमाही चांगली आणि उत्साह वाढवणारी असल्याचे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का म्हणाले.
ख्रिसमसमुळे विमा आणि रिटेल क्षेत्रात कामाचे घटलेले दिवस यामुळे इन्फोसिसच्या दुस-या सहामाहीतील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता मुख्य परिचालन अधिकारी यू. बी. प्रवीण राव यांनी व्यक्त केली. भूतकाळातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगाची कामगिरी पाहिल्यास पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसरी सहामाही निराशाजनकच राहिलेली असल्याचे ते म्हणाले.
दुस-या तिमाहीत कंपनीच्या महसुलात उत्तर अमेरिकेचा ६३.३ टक्के वाटा राहिला. तर युरोप, भारत आणि जगभरातील उर्वरित बाजारपेठांतून अनुक्रमे २२.९ टक्के, २.३ टक्के आणि ११.५ टक्के एवढे योगदान राहिले.
जुलै-सप्टेंबर या कालावधीत इन्फोसिस आणि तिच्या उपकंपनीने ८२ नवे ग्राहक जोडले. तर कंपनीने ८,४५३ कर्मचारी जोडले असून ३० सप्टेंबरअखेर एकूण संख्या १,८७,९७६ वर गेली आहे. या महिन्यात कंपनीच्या कर्मचारी गळतीचे प्रमाण १९.९ टक्के असून पहिल्या तिमाहीच्या १९.२ टक्क्यांच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण २४.८ टक्के होते.
इन्फोसिसचा शेअर घसरला
चालू वर्षातील डॉलरमधील महसुली अंदाज घटवल्याने गुंतवणूकदारांनी इन्फोसिसच्या शेअरची जोरदार विक्री केली. दिवसअखेरीस हा शेअर ३.८८ टक्क्यांच्या घसरणीसह ११२२.५० रुपयांवर बंद झाला.
एनएसईवर हा शेअर ३.८१ टक्क्यांच्या घसरणीसह ११२२.९० रुपयांवर बंद झाला. यामध्ये कंपनीच्या बाजारमूल्यात १०,४१५.९६ कोटी रुपयांची घट होऊन ते २,५७,८३२.०४ कोटींवर घसरले आहे. दिवसभरात बीएसईवर १२.७१ लाख शेअरची, तर एनएसईवर एक कोटी शेअरची उलाढाल झाली.
‘सीएफओ’ राजीव बन्सल यांचा राजीनामा
इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) आणि कार्यकारी उपाध्यक्ष राजीव बन्सल यांनी कंपनीतून राजीनामा दिला आहे. ऑक्टोबर २०१२पासून ते या पदावर होते. त्यांनी राजीनाम्यामागचा उद्देश कंपनीकडे स्पष्ट केला आहे असे इन्फोसिसने म्हटले आहे.
मात्र हे कारण स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या जागी कंपनीत जवळपास १५ वष्रे सेवा बजावणा-या एम.डी. रंगनाथ सोमवारपासून कार्यभार सांभाळतील, असे कंपनीने म्हटले आहे. त्यांची मुख्य वित्तीय अधिकारी आणि महत्त्वाचे व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सध्या ते कार्यकारी उपाध्यक्ष आणि धोरणात्मक कारभार विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.