उत्पादन क्षेत्राने पुन्हा एकदा मान टाकली असून उत्पादनाचे प्रमाण चार महिन्यांतील नीचांकी स्तरावर उतरले आहे.
नवी दिल्ली- उत्पादन क्षेत्राने पुन्हा एकदा मान टाकली असून उत्पादनाचे प्रमाण चार महिन्यांतील नीचांकी स्तरावर उतरले आहे. नवीन ऑर्डर येणे बंद झाले असून कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्या असल्याने हे झाले असल्याचे मासिक अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने आणखी व्याज दरात कपात करावी, या मागणीचा गदारोळ वाढला आहे.
निक्की मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर निर्देशांकानुसार (पीएमआय) मार्चमध्ये उत्पादन क्षेत्राची कामगिरी ५२.४ वरून एप्रिलमध्ये ५०.५ वर आली आहे. ५०च्या वर असेल तर ती उत्पादन क्षेत्राचा विस्तार समजला जातो तर ५०च्या खाली असेल तर घट समजली जाते. एप्रिलमध्ये पीएमआय आकडेवारीवरून उत्पादन विस्तारात मोठय़ा प्रमाणावर मंदी दर्शवते कारण नवीन उत्पादन पूर्णपणे थंडावले आहे, असे मार्किटचे अर्थतज्ज्ञ पॉलिन्ना डे लिमा यांनी सांगितले.
तीन महिने सलग वाढ पाहिल्यानंतर भारतीय उत्पादन क्षेत्राला एप्रिलमध्ये नवीन ऑर्डर्स येणे बंद झाल्याचे दिसते आहे. परदेशातून येणा-या नवीन ऑर्डर्सचे प्रमाण वाढत असले तरीही निर्यातीच्या नव्या ऑर्डर्स अत्यंत संथगतीने वाढत आहेत. रोजगाराच्या आघाडीवर मात्र उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत दोन वर्षातील कल तसाच राहिला आहे. कच्च्या मालाच्या किमती ११ महिन्यांतील सर्वात जलद गतीने वाढल्या असून विक्री किमत वाढवून अतिरिक्त खर्च ग्राहकांना पास ऑन केला आहे.
५ एप्रिलला रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांनी रेपो रेटमध्ये पाव टक्क्यानी कपात केली. परंतु उद्योग क्षेत्राला आणखी कपातीची अपेक्षा आहे. तशी मागणी होत असताना आता या आकडेवारीने ती मागणी अधिक धारदार झाली आहे.