गटाने येणारे कुटुंबीय किंवा मित्र-परिवार जेवणाचा आस्वाद घेणार असतील तर ते सामीष की शाकाहारी हे विचारावे, असे वाढप्यास (वेटर) सांगितलेले असे.
बाँबे जिमखान्याच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित महोत्सवी सामन्यातील एक गंमतीदार प्रसंग आठवतो. पूर्वी बाँबे जिमखान्यात जेवणासाठी येणारे सर्व गोरे असल्यामुळे त्यांचा भर सामिष (नॉन-व्हेज) पदार्थावर असे. नंतर भारतीयही सभासद झाल्यामुळे जेवणारे सामीष तसेच शुद्ध शाकाहारीही असत. त्यामुळे गटाने येणारे कुटुंबीय किंवा मित्र-परिवार जेवणाचा आस्वाद घेणार असतील तर ते सामीष की शाकाहारी हे विचारावे, असे वाढप्यास (वेटर) सांगितलेले असे. तेही काटेकोरपणे पाळले जाई. फक्त थोडक्यात ‘व्हेज किंवा नॉन-व्हेज’ असे विचारले जाई. त्याप्रमाणे बाँबे जिमखान्याचा ‘बीजी’ हा निळय़ा अक्षरातील छाप असलेल्या बशा सामीषांसाठी तो छाप वरच्या बाजूस तर शाकाहारींसाठी तो उजव्या बाजूस असे. त्यामुळे वाढप्याला तसे पदार्थ वाढणे, सोपे व्हावे.
महोत्सवी सामन्यातही जेवणाच्या सुट्टीत टेबलावर आसनस्थ झाल्यावर प्रत्येक खेळाडूस कोणत्या प्रकारचे जेवण हवे, असे विचारले जात असे. असे सांगतात व ऐकिवात आहे की, एका जुन्या खेळाडूला व्हेज किंवा नॉन-व्हेज, असे विचारताच त्याने ‘नान’ असे उत्तर दिले. सूप आल्यावर टोमॅटोचा रंग पाहून ते घेतले. नंतर ब्रेड व नान आल्यावर नान पानात घेतली. वेटर त्यांच्या पानात मटणाचे तुकडे आणि रस्सा टाकू लागल्यावर ते उठून उभे राहिले. ‘हे काय, मी शाकाहारी आहे. हे काय वाढता?’ असे म्हणू लागले. तेव्हा वेटरचा कॅप्टन आला. त्याने त्यांची बशी पाहून सामीषाची असल्याचे कळल्यावर ‘तुम्ही ‘नॉन’ सांगितलेत. म्हणून त्यांनी तसे मटण आणले,’’असे म्हटल्यावर ‘‘मी ‘नान’ म्हटले म्हणजे मला नान हवी. ब्रेड नको. हा उद्देश होता,’’असे म्हणताच बाजूचे खेळाडू हसू लागले. मात्र कॅप्टनने त्यांची समजूत काढून दिलगिरी व्यक्त केली. नंतर काही खेळाडू मिष्कीलपणे आपापसांत ‘हा खेळाडू, ‘नॉन स्ट्राइक’ला काय म्हणेल? ’ असा विनोद करत होते.
त्या सामन्याबद्दल आणखी एक किस्सा. सामन्याच्या दुस-या दिवशी दुपारी एक वाजता मी ‘फ्लोरा फाउंटन’जवळील (हुतात्मा चौक) माझ्या कार्यालयातून जेवणासाठी खाली उतरलो. समोरच्या गोदरेजच्या शोरूमसमोर शूते बॅनर्जी कपाटे निरखत उभे असलेले दिसले. त्यांना भेटून चौकशी केली असता, ‘‘संध्याकाळी परत जाण्याआधी काही तरी खरेदी करावी (कपडे वैगेरे) म्हणून फिरत आहे,’’ असे त्यांनी सांगितले. तेव्हा नवल वाटले. नंतर कळले की, यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे तरी हे तो सामना खेळले आणि मुंबईची मजा अनुभवत आहेत.
शेवटी हेही नमूद करावेसे वाटते की, अशा सामन्यांचे मानधन मिळत नसले तरी पूर्वी स्टेडियममधून ज्यांना खेळताना लांबून पाहिले, त्यांना भेटण्याची आणि त्यांचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे समाधान मिळाले. हेही नसे थोडके. (समाप्त)