सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा महामंडळ (एलआयसी)ने आपल्या १४ जीवन विमा उत्पादनांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा महामंडळ (एलआयसी)ने आपल्या १४ जीवन विमा उत्पादनांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जीवन मित्र आणि अनमोल जीवन या लोकप्रिय पॉलिसींचा समावेश आहे. विमा नियामकाच्या सूचनेनुसार या विमा पॉलिसी बंद करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) जीवन विमा उद्योगाला नवीन वैयक्तिक विमा नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबपर्यंत मुदत दिली होती.
विमा पॉलिसी अधिक ग्राहकस्नेही बनवण्याचा नियमावलीचा उद्देश आहे. सर्व समूह विमा आणि वैयक्तिक विमा उत्पादने जी या नियमावलीची पूर्तता करणारी नाहीत, अशी उत्पादने अनुक्रमे एक ऑगस्ट २०१३ आणि एक जानेवारी २०१४पासून मागे घेण्याचे परिपत्रक इर्डाने जारी केले होते.
१४पैकी सात विमा उत्पादने १६ नोव्हेंबरपासूनच थांबवण्यात आली आहेत. तर जीवन मित्र, जीवन प्रमुख प्लान, एलआयसी बिमा अकौंट एक आणि दोन ही उत्पादने शनिवारपासून बंद होणार आहेत. तर जीवन निधी आणि अनमोल जीवन एक ही उत्पादने ३० नोव्हेंबरपासून खंडित होणार आहेत. मात्र नूतनीकरणाच्या टप्प्यावर असलेल्या पॉलिसींना नवीन आवृत्तीमध्ये परावर्तित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आतापर्यंत इतर १९ पॉलिसी बंद करण्यात आल्या आहेत.