होबार्ट येथील ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जेम्स पेटींसनने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिस-याच दिवशीच वेस्ट इंडिजवर एक डाव आणि १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
होबार्ट – होबार्ट येथील ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जेम्स पेटींसनने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिस-याच दिवशीच वेस्ट इंडिजवर एक डाव आणि १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून झालेला वेस्ट इंडीजचा हा दुसरा मोठा पराभव आहे.
ऑस्ट्रेलियाने अॅडम व्होग्स (२६९) आणि शॉन मार्श (१८२) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ४ बाद ५८३ धावांवर पहिला डाव घोषित केला. तर व्होग्स आणि मार्श यांनी चौथ्या गड्यासाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारी रचली.
प्रत्युत्तरात ५८३ धावांचे आव्हान स्विकारुन फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडीजने दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात ६ गड्यांच्या बदल्यात २०७ धावांपर्यंत मजल मारली होती. डरेन ब्राव्हो (९४) आणि केमार रोच (३१) धावांवर नाबाद होते. तिस-या दिवशी ब्राव्होने शतक पूर्ण करून १०८ धावा केल्या. मात्र त्यानंतर तो बाद झाला. तर कोमार रोच तिस-या दिवशी एकही धाव करून शकला नाही. त्यामुळे संपूर्ण वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या २२३ धावांत आटोपला.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या जोश हाझलेवूडने चार, नेथन लायनने तीन आणि पीटर सिडलने दोन गडी बाद केले.
दरम्यान फॉलोऑन मिळालेला वेस्ट इंडीज संघाचा डाव दुस-या डावातही ३६० धावांचे लक्ष्य गाठताना पुन्हा कोसळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना ३६.३ षटकांत १४८ धावांवर गुंडाळून पहिली कसोटी खिशात घातली.
वेस्ट इंडीजकडून दुस-या डावात एकट्या क्रेग ब्रेथवेटने सर्वाधिक ९४ धावा केल्या. तर अन्य फलंदाजांनी १४८ धावा केल्या. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाकडून जेम्स पेटींसनने पाच आणि हेझलवूडने तीन बळी घेतले. व्होग्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
वेस्ट इंडीजने आतापर्यंत झालेल्या २१ कसोटी सामन्यातील अवघे चार सामने जिंकले आहेत. शनिवारी झालेल्या दारुण पराभवामुळे कसोटी क्रमवारीत वेस्ट इंडीज तळाच्या संघातील बांगलादेश आणि झिम्बाब्वे पाठोपाठ तिस-या स्थानी पोहचले आहे.