अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कैदेत असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकन पत्रकार सेमुर हर्ष यांनी केला आहे.
नवी दिल्ली- अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कैदेत असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकन पत्रकार सेमुर हर्ष यांनी केला आहे. शिवाय आयएसआयच्याच एका माजी अधिका-याने सुमारे २५ मिलियन डॉलर घेऊन ओसामाचा पत्ता अमेरिकेला दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
२०११मधील मे महिन्यात अमेरिकेने लादेन राहत असलेल्या अबोटाबाद मधील घरात घुसून त्याचा खात्मा केला होता. या मिशनची माहिती अमेरिकेतील काही वरिष्ठ अधिकारी सोडून कुणालाही नव्हती. मात्र हर्ष यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानी लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारी व आयएसआयला या मिशनची कल्पना देण्यात आली होती.
‘लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स’ मध्ये प्रसिद्ध एका लेखात त्यांनी हा दावा केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी व आयएसआयचे प्रमुख जनरल अहमद शुजा पाषा यांना या मिशन बाबत पूर्ण माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हर्ष यांच्या दाव्यामुळे लादेनला मारताना अमेरिकेने केलेल्या गुप्ततेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लादेन हा २००६ पासून आयएसआयच्या कैदेत होता. आयएसआयने त्याला अबोटाबाद येथील एका घरात कैद करून ठेवले होते. त्यानंतर अमेरिकेने ओसामाचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानी लष्करप्रमुख व आयएसआयच्या प्रमुखांना तयार केल्याचा दावा हर्ष यांनी केला आहे.
पाकिस्तानी लष्कर प्रमुख व आयएसआयच्या प्रमुखांना अमेरिकेच्या मिशनची पूर्ण माहिती होती. इतकेच नव्हे, तर ओसामाला मारण्यासाठी सनिकांना घेऊन आलेले अमेरिकेचे दोन्ही हेलीकॉप्टर कुठल्याही अडचणीशिवाय पाकिस्तानी हवाई हद्दीत येऊ शकतील, याची काळजीदेखील या दोघांनी घेतली होती, असेही हर्ष यांनी म्हटले आहे.
लादेन हा अबोटाबाद येथील वास्तव्यात आजारी होता. त्यावेळी आयएसआयने त्याच्यावर उपचार करण्यासाठी पाकिस्तानी लष्करात मेजर पदावर असलेल्या डॉक्टर अमीर अझीझ यांना त्याच्यावर उपचार करण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी अमेरिकेच्या मागणीवरून अझीझ यांनी ओसामाच्या ‘डीएनए’चे नमुने अमेरिकेला दिले होते व त्यावरून अमेरिकेने तिथे लादेनच असल्याची खात्री करून घेतली होती.
पाकिस्तानने भविष्यात अमेरिकन सन्याची मदत मिळावी व दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेचे आर्थिक सहाय्य मिळावे, या हेतूने ही मदत केल्याचा दावाही सेमुर हर्ष यांनी केला आहे.