चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय कंपन्यांनी जवळपास ३ लाख कोटी रुपयांची बाजारातून भांडवल उभारणी केली.
नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय कंपन्यांनी जवळपास ३ लाख कोटी रुपयांची बाजारातून भांडवल उभारणी केली. मात्र या कालावधीत व्यावसायिक गरजेसाठी भांडवल उभारणीसाठी कंपन्यांनी सर्वाधिक पसंती ही डेट बाजाराला दाखवली.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये कंपन्यांनी डेट आणि शेअर बाजारातून एकूण २,९०,४७० कोटी रुपयांची भांडवल उभारणी केली आहे. यापैकी २.४४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल उभारणी ही डेट बाजारातून झाली आहे. तर ४६,१९७ कोटी रुपये शेअर बाजारातून उभारले आहेत.
व्यवसाय विस्ताराबरोबरच खेळत्या भांडवल आणि कर्जफेडीसाठी ही भांडवल उभारणी करण्यात आली. शेअर बाजारातून उभारण्यात आलेल्या भांडवलात प्रेफरेन्शिअल शेअर २०,८७४ कोटी, क्लालिफाईड इन्स्टिटय़ुशनल १२,६५८ कोटी रुपये, हक्कभाग ७,७६० कोटी रुपये आणि आयपीओ ४,९०४ कोटी रुपये असा वाटा आहे.
तर डेट बाजारामध्ये २.४३ लाख कोटी कर्जाच्या माध्यमातून तर १५५३ कोटी रुपये कर्जरोख्यांतून उभारण्यात आले. शेअर बाजारातील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांचे बाँडना गुंतवणूकदारांनी अधिक पसंती दाखवली आहे. कंपन्यांनीही बँकांच्या कर्जापेक्षा स्वस्त भांडवल उभारणी म्हणून कंपन्यांनी बाँडविक्रीलाच अधिक झुकते माप दिले.