‘स्काय बियॉन्ड दि क्लाऊड्स’ या विशेषत: तरुण वाचकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या पुस्तकाचा लेखक दीपक राणा हा देखील पुस्तक वाचल्यानंतर याच पठडीतला वाटतो.
आयुष्यात कधीतरी लेखक व्हावं अशी सुप्त इच्छा बाळगणारा साधारण चारपैकी एक माणूस आपल्याला आजूबाजूला अगदी कधीही पाहायला मिळेल. जेव्हापासून चेतन भगतने बँकेतली नोकरी सोडून संपूर्ण वेळ लिखाणाला देण्याचा पराक्रम केलाय, तेव्हापासून त्याच्या पावलावर पाऊल टाकत मोठ-मोठय़ा कंपन्यांमधल्या नोक-यांना रामराम ठोकणा-या अनेक हौशा-नवशा लेखकांचं जणू पेव फुटलंय. ‘स्काय बियॉन्ड दि क्लाऊड्स’ या विशेषत: तरुण वाचकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या पुस्तकाचा लेखक दीपक राणा हा देखील पुस्तक वाचल्यानंतर याच पठडीतला वाटतो.
भारतीय सन्यात जाऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न उरी बाळगणा-या एका नवतरुणाची ही कथा आहे. केवळ आजोबांचाच आधार सोबतीला असलेला कथेचा नायक, त्यांच्याच प्रेरणेने सन्य भरतीसाठी आवश्यक परीक्षा देतो, जिथे त्याची आणि प्रशिक्षणादरम्यान झालेल्या त्याच्या जिगरी मित्रांची कसोटी लागते. सन्यदलात भरती होण्यासाठी अनेक कर्मकठीण आव्हानांचा सामना करत राजेश म्हणजेच कथेचा नायक अगदी अंतिम टप्प्यावर अपयशी होतो. पुढे अनेक लहान-मोठय़ा समस्या त्याच्यापुढे उभ्या राहतात. अनेक घटना, प्रसंगांतून प्रवास करत ही कथा पूर्णत्वाकडे पोहोचते. पण वाचकाला अपूर्णत्वाची रुखरुख देऊन जाते. मुळात लेखकाचा या कथेमागचा उद्देशच कुठेही स्पष्ट होत नाही. आणि त्याने ‘परिस्थितीचे चटके’ वगरे म्हणून वर्णन केलेल्या अनेक घटना तेवढय़ाशा प्रभावी वाटत नाहीत.
लेखक दीपक राणा एनआयटी कुरुक्षेत्रमध्ये इंजिनीयिरग करून डिलॉइटसारख्या मोठय़ा कंपनीत कामावर होता. एक-दीड वर्षानंतरच काम सोडून लेखनाकडे वळला. ऑफिसजवळच्या चहावाल्याकडे दोन तरुणींना सन्य दलातील जवानांपेक्षा कॉर्पोरेटमधले तरुण अधिक स्मार्ट असतात, असं बोलताना ऐकून सन्यदलात जाण्याची प्रचंड इच्छा असलेल्या राणाची तळपायाची आग मस्तकात गेली आणि सन्यदलात जाण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात हे जगाला सांगण्यासाठी त्याने हे लिखाण सुरू केलं.
पण ‘स्काय बियॉन्ड दि क्लाऊड्स’मध्ये केलेलं सन्यदलात स्थान मिळवण्यासाठीच्या धडपडीचं वर्णन फारच जुजबी वाटतं. अनेक पात्रांचा उगीच भरणा केल्यामुळे एकही पात्र धड उभं करता आलेलं नाही. पुस्तकाच्या शेवटाकडे रेश्मा आणि डॉ. इशा या ज्या दोन पात्रांचा उल्लेख प्रकर्षाने झाला आहे, त्यांचा संदर्भ पुस्तकात शोधताना नाकीनऊ येतात इतका नगण्य आहे. तरुण पिढीला आकृष्ट करण्यासाठी एखादा कामोत्तेजक, बोल्ड उल्लेख असायलाच हवा अशा जणू नियमानेच वेश्यावस्तीमधला एक प्रसंग उगीच घुसवल्यासारखा वाटतो. या पुस्तकात नमूद केलेल्या प्रत्येक स्थळावर लेखकाने स्वत: जाऊन अभ्यास केला आहे म्हणे; पण त्यामुळे कथेत स्थळाचे वर्णन करणारा प्रत्येक भाग गोष्टीचा भाग कमी आणि माहितीपर उतारा अधिक वाटतो.
नियमित इंग्रजी वाचन करणा-यांच्या एक गोष्ट पटकन लक्षात येईल, ती म्हणजे पुस्तकाची भाषा, सोपं करण्याच्या नादात अत्यंत बाळबोध इंग्रजीचा वापर संपूर्ण पुस्तकात झाला आहे. त्यामुळे एक फायदा असा आहे की अगदी शाळेत जाणारा लहान मुलगाही हे पुस्तक वाचू शकतो. कदाचित लेखकाचा तोच हेतू असावा. त्यामुळे नव्याने इंग्रजी वाचन सुरू करण्याच्या बेतात असणा-यांनी हे पुस्तक वाचायला हरकत नाही.
थोडक्यात ‘स्काय बियॉन्ड दि क्लाऊड्स’ मधून लेखकाला नेमकं काय अभिप्रेत आहे, याचा उलगडा शेवटपर्यंत होत नाही आणि लेखकाच्या कल्पनेचं क्षितिज पात्रांच्या, घटनांच्या आणि शब्दांच्या ढगांच्या गर्दीत अखेपर्यंत वाचकाला दिसतच नाही.
स्काय बियॉन्ड दि क्लाऊड्स : दीपक राणा
प्रकाशक : फ्रॉग बुक्स
पाने : १६२ मूल्य : १२५ रुपये