चॉकलेट व बिस्किट क्षेत्रातील कॅडबरी इंडिया लिमिटेड कंपनीने कोटय़वधी रुपयांचे उत्पादन शुल्क चुकवल्याचे उघड झाले आहे.
नवी दिल्ली – चॉकलेट व बिस्किट क्षेत्रातील कॅडबरी इंडिया लिमिटेड कंपनीने कोटय़वधी रुपयांचे उत्पादन शुल्क चुकवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कंपनीला ५७० कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे.
हिमाचल प्रदेशमधील बड्डी येथे कॅडबरीचे उत्पादन केंद्र आहे. कंपनीला तेथे कर सवलत मिळाली होती. कंपनीने याच भागात दुसरे उत्पादन केंद्र सुरू केले. तेथेही कर सवलत मिळण्याचा हेका धरला. या सर्व प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात २०११ केंद्रीय उत्पादन गुप्तचर महासंचालनालयाने कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू केली. ती पूर्ण झाल्यानंतर महासंचालनालयाने कॅडबरी कंपनीकडे (आताची मेंडोलेझ इंडिया फुड्स प्रा. लि.) २५० कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली.
२८ जुलै २०१० ते ३१ जानेवारी २०१३ दरम्यान २३१ कोटी, १ फेब्रुवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान १११.३६ कोटी आणि दंड २३१.४७ कोटी रुपयांची मागणी केली. उत्पादन शुल्काबाबतचा नियमभंग केल्याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद कृपालू यांच्यावर एक कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड बसवला आहे, अशी माहिती केंद्रीय उत्पादन गुप्तचर महासंचालनालयाच्या सूत्रांनी दिली.