स्टुअर्ट बिन्नीच्या आक्रमक शतकाच्या जोरावर (१०७ चेंडूंत नाबाद ११५ धावा) इराणी करंडकात सोमवारी दुस-या दिवशी शेष भारताविरुद्ध रणजी विजेता कर्नाटकने पहिल्या डावात आघाडी घेतली.
बंगळूरु – स्टुअर्ट बिन्नीच्या आक्रमक शतकाच्या जोरावर (१०७ चेंडूंत नाबाद ११५ धावा) इराणी करंडकात सोमवारी दुस-या दिवशी शेष भारताविरुद्ध रणजी विजेता कर्नाटकने पहिल्या डावात आघाडी घेतली. याबरोबरच इराणी करंडक पाचव्यांदा पटकवण्याच्यादृष्टीने कर्नाटकने त्यांची दावेदारी भक्कम केली.
कर्नाटककडे आता पहिल्या डावात १८९ धावांची आघाडी असून अजून त्यांचे पाच फलंदाज बाकी आहेत. शेष भारताच्या २०१ धावांना उत्तर देताना कर्नाटकने दिवसअखेर ५ बाद ३९० अशी दमदार मजल गाठली. खेळ थांबला तेव्हा शतकवीर बिन्नीसह गौतम (खेळत आहे ६) मैदानात होता.
बिन्नीने प्रथम श्रेणीतील आठवे शतक साजरे केले. अवघ्या ८२ चेंडूंतच त्याने शतक फलकावर लावले होते. त्याच्या एकूण खेळीत १४ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याच्या फटकेबाजीमुळे कर्नाटकला आघाडीतही झटपट वाढ करता आली. त्याने करुण नायरसह (९२) पाचव्या विकेटसाठी केलेली १८७ धावांची भागीदारी महत्वपूर्ण ठरली.
नायरचे शतक मात्र थोडक्यासाठी हुकले. त्याचा पंकज सिंगने त्रिफळा उडवला. तत्पूर्वी, १ बाद ३५ धावांवरून दिवसाचा खेळ सुरू करणा-या कर्नाटकने सकाळच्या सत्रात भरवशाचा फलंदाज लोकेश राहुलला (३५) गमावले. त्याला अनुरीत सिंगने बाद केले. पाठोपाठ भरवशाचा मनिष पांडेही (३६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
मात्र गणेश सतीशने ८४ धावा फटकवत कर्नाटकच्या डावाला आकार दिला. मात्र कर्णधार आणि ऑफस्पिनर हरभजनने सतीशचा अडसर दूर केला. या विकेट वगळता शेष भारताच्या गोलंदाजांना विशेष यश लाभले नाही. भरवशाचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडा दिवसभरात एकही विकेट घेऊ शकला नाही.
बिन्नीची अष्टपैलू चमक
स्टुअर्ट बिन्नीने रविवारी गोलंदाजीतही चमक दाखवत शेष भारताचा डाव गुंडाळण्यात योगदान दिले होते. यंदाच्या रणजी हंगामात बिन्नीला शतक झळकवता आले नव्हते. मात्र त्याने गोलंदाजीतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड दौ-यातील वनडे संघात जागा मिळवली. न्यूझीलंड दौ-यात त्याला एकाच वनडेत संधी मिळाली. त्यात गोलंदाजीसाठीदेखील त्याच्या वाटय़ाला एकच षटक आले होते. त्या वनडेत त्याला फलंदाजीची संधीच मिळालीच नव्हती. न्यूझीलंड दौ-यामुळे बिन्नीला कर्नाटकडून रणजी करंडकातील महत्वपूर्ण बाद फे-यांना मुकावे लागले. मात्र इराणी करंडकात मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उठवत पुन्हा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.