उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागातील कर पावत्या या यापूर्वी टपालामार्फत पाठवल्या जायच्या.
उल्हासनगर – उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागातील कर पावत्या या यापूर्वी टपालामार्फत पाठवल्या जायच्या. आता या कर पावत्या प्रायोगिक तत्त्वावर महिला बचत गटांमार्फत वाटल्या जाणार असल्याने महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या कर विभागामार्फत दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस कर पावत्या मालमत्ताधारकांना वितरीत केल्या जातात. या करपावत्या स्पीड पोस्टमार्फत वितरीत केल्या जातात. या कर पावत्या पोस्टामार्फत वेळेत मालमत्ताधारकांच्या घरी पोहोचत नसल्याने नगरसेवकांनी महासभेत आवाज उठवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवाध्यक्ष संदीप गायकवाड यांनीही पत्ता न मिळाल्यामुळे टपाल खात्याने परत पाठवलेल्या कर पावत्यांचा भांडाफोड केला होता.
पन्नास टक्के कर पावत्याही टपाल खात्यामार्फत मालमत्ताधारकांच्या घरापर्यंत पोहोचत नसल्याने यावेळी महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी महिला बचत गटांमार्फत कर पावत्या वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
वितरणाचा खर्च आठ रुपयांनी वाचणार
यापूर्वी स्पीड पोस्टला प्रत्येक कर पावतीमागे १७ रुपये खर्च देण्यात येत आहे. महिला बचतगटांना प्रत्येक कर पावतीमागे ९ रुपये देण्यात येणार असल्याने वितरणाचा खर्चही वाचणार असल्याने महापालिकेसाठी महिला बचतगटाचे सहकार्य घेतल्याने फायदा होणार असल्याचे कर विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर प्रभाग ४१ साठी जिजाऊ महिला बचतगट, प्रभाग ४२ साठी अहिल्याबाई महिला बचतगट, प्रभाग ४३ साठी दृष्टी महिला बचतगट, प्रभाग ४४ साठी वैभवलक्ष्मी महिला बचतगटाची नियुक्ती केली आहे. अशी माहिती कर निर्धारक आणि संकलक शैलेश दोंदे यांनी दिली.