आतापर्यंत तुम्ही थंडगार, लालचुटूक, रसरशीत अशा कलिंगडांवर चांगलेच तुटून पडले असाल. कधी कलिंगडाचा ज्यूस तर कधी कलिंगडाच्या चाट मसाला टाकून थंड केलेल्या फोडी.. पण या कलिंगडापासून काहीतरी छान करता येऊ शकतं, याचा कधी विचार केला आहे का?
कलिंगडापासून तुम्ही खूप छान गोष्टी करता येतात. आज आपण कलिंगडापासून परडी कशी करायची ते पाहूया. त्यातून तुम्हाला काहीतरी छान केल्याचा आनंदही मिळेलच, पण ती तुम्हाला खाताही येईल.
साहित्य : गोल कलिंगड, सुरी, पेन्सिल
कृती : तुमच्या अंदाजाने पेन्सिलिने कलिंगडाच्या अध्र्या भागात परडीचा आकार काढून घ्या. त्यात परडीला हँडल असतं त्याप्रमाणे हँडलही काढून घ्या. आता त्या पेन्सिलच्या बॉर्डरवर सुरी फिरवा. हँडलच्या बाजूचा सगळा भाग कापून घ्यावा. आता कलिंगडाच्या खालच्या भागातील गर काढून घ्या. हा गर तुम्ही खाऊदेखील शकता. आता त्या परडीच्या खालच्या भागावर चाकूने त्रिकोणी भाग करा. म्हणजे तुमच्या परडीची कडा सुंदर दिसेल. आता या तयार झालेल्या परडीत तुम्हाला हवी असलेली फळं ठेवा. आणि ही परडी टेबलावर ठेवा.
खरं म्हणजे घरी कलिंगड दोन भागात कापतात. तसं कापूनही तुम्ही परडी करू शकता. उरलेल्या कापलेल्या भागातून हँडलचा आकार काढून घ्या आणि दुस-या कलिंगडावर दोन्ही बाजूंनी टाचणीने लावून घ्या.