कल्याण लोकसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेची पळापळ उडाली आहे.
डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेची पळापळ उडाली आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरले असून, एकीकडे पुत्राला निवडून आणण्यासाठी पित्याची तर दुसरीकडे भावाला निवडून आणण्यासाठी रमेश पाटील यांची धडपड सुरू झाली आहे.
पाटील आणि शिंदे हा दोस्ताना असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांचे हाडवैरी असलेले हे पक्ष काय चमत्कार घडवतात, याकडे लक्ष लागले आहे. कल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे, शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदे तर मनसेकडून राजू पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आनंद परांजपे हे खासदार म्हणून निवडून आले. मात्र परांजपे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याने शिवसेनेला ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत. परांजपे यांच्या नावाचा जप करणा-या शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून, त्यांना पराभूत करण्यासाठी शिंदेपुत्रांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र मनसेने राजू पाटील यांना रिंगणात उतरवल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. कल्याण ग्रामीण व शहर भागात पाटील बंधूचे वर्चस्व असून, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे व पाटील कुटुंबीयांचे घरोब्याचे संबध आहेत. त्यामुळे शिंदे आणि पाटील कुटुंबीयांची पंचाईत झाली आहे.
कल्याणमधून श्रीकांत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी पाटील कुटुंबीयांपैकी कुणाही निवडणूक रिंगणात उतरू नये, अशी गळ घातली होती. दोघांच्या भांडणात तिस-याचा लाभ होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना रिंगणात उतरवल्याने सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.