मुंबईत झालेल्या हल्ल्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने काय चुका केल्या, यासंदर्भात लष्कर-ए-तैयबाच्या नव्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे माहिती दिली जात आहे.
श्रीनगर/नवी दिल्ली- मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ल्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने काय चुका केल्या, यासंदर्भात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या नव्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे माहिती दिली जात आहे. लष्करे तैयबाचा दहशतवादी मोहम्मद नवीद जट ऊर्फ अबू हंझाला याला गेल्या महिन्यात पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये अटक केली होती. मूळचा पाकिस्तानमधील मुलतान येथील असलेल्या हंझाला याच्या चौकशीदरम्यान ही बाब उघडकीस आली आहे.
हंझाला याचे वडिल पाकिस्तानी सैन्यामधील निवृत्त चालक असून त्याचे शिक्षण जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेकडून चालविल्या जाणा-या मदरशामध्ये झाले आहे.
कसाब याला भेटल्याची कबुली देणारा हंझाला हा पहिलाच दहशतवादी आहे. ‘लष्कर’कडून चालवण्यात येणा-या बोरेवाला साहिवाला येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रामध्ये हंझाला याची ओळख कसाब याच्याशी झाली होती. हंझाला हा पाचवी नापास आहे. ‘लष्कर’च्या प्रशिक्षणांतर्गत कसाब याच्या चुकांसंदर्भात नव्या प्रशिक्षणार्थींना माहिती दिली जात असल्याचे हंझालाच्या चौकशीमधून स्पष्ट झाले आहे.
मुंबईच्या तटाजवळ आल्यानंतर बोट नष्ट न करणे, सॅटेलाइट फोनवर बोलताना आपली ओळख दडवून न ठेवणे, कोणासही ओलिस धरण्यात आलेले अपयश व अटक अशी कसाब याच्या अपयशाची यादी प्रशिक्षणामधून शिकवण्यात येत असल्याचे हंझाला याने सांगितले.