बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिला दिवस गाजवताना दुस-या कसोटीत शुक्रवारी पहिल्या डावात सहा बाद 328 अशी चांगली धावसंख्या उभारली.
बंगळूरु- बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिला दिवस गाजवताना दुस-या कसोटीत शुक्रवारी पहिल्या डावात सहा बाद 328 अशी चांगली धावसंख्या उभारली. मागील चुका टाळण्यात किवींच्या फलंदाजांना यश आले तरी एम. चिन्नास्वामी स्टेडियमची ‘पाटा’ खेळपट्टी त्यांच्यावर मेहेरबान ठरली, असेच म्हणावे लागेल. हैदराबाद गाजवणा-या ऑफस्पिन रविचंद्रन अश्विन आणि लेगस्पिनर प्रग्यान ओझाला पहिल्या दिवशी खेळपट्टीकडून अजिबात ‘टर्न’ मिळाला नाही.
कर्णधार रॉस टेलरची (113) दमदार खेळी तसेच क्रगर वॅन विक (खेळत आहे 63) आणि मार्टिन गप्टिलची (53) त्याला मिळालेली सुरेख साथ पाहता पाहुण्यांनी दमदार सुरुवात केली. एक शतकी (107) आणि दोन अर्धशतकी भागीदा-या (63 आणि नाबाद 82) रचत या त्रिकुटाने भारताच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. हवामान खात्याने पहिल्या दिवसापासूनच तुरळक पावसाची शक्यता वर्तवली होती. शेवटी-शेवटी रिमझिम पाऊस पडला तरी दिवसभर मात्र ढगाळ वातावरण होते. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवशी 8.3 षटके आधी खेळ थांबवावा लागला.
नाणेफेक जिंकलेल्या रॉस टेलरने प्रथम फलंदाजी करण्याला प्राधान्य दिले. लेगस्पिनर प्रग्यान ओझाने भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताच्या फिरकीपटूने कसोटीत पहिले षटक टाकण्याची ही पहिलीच वेळ होती. फॉर्मात असलेल्या सलामीवीर ब्रेंडन मॅककलमला (0) डावखु-या झहीर खानने वैयक्तिक पहिल्या आणि डावाच्या दुस-याच षटकात माघारी धाडताना पाहुण्यांना सुरुवातीलाच हादरवले. मात्र त्यानंतर पुढील दोन सत्रांत भारताला केवळ चार विकेट्स मिळवता आल्या. सलामीवीर मार्टिन गप्टिलने (53) केन विल्यमसनसह (17) दुस-या विकेटसाठी 63 धावा करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. उपाहारापूर्वी या दोघांना बाद करण्यात लेगस्पिनर ओझाला यश आले.
दुस-या सत्राचा ‘हीरो’ कर्णधार टेलर ठरला. त्याने कारकीर्दीतील 17वे कसोटी शतक झळकावताना न्यूझीलंडला सुस्थितीत नेले. त्याच्या झटपट शतकी खेळीत 16 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याने डॅनियल फ्लिनसह (33) चौथ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. गप्टिल आणि टेलरनंतर यष्टिरक्षक क्रगर वॅन विकने भारताची गोलंदाजी सहज खेळून काढली. चहापानानंतर फ्लिन
आणि जेम्स फ्रँकलिन (8) लवकर परतल्यानंतर ऑफस्पिनर अश्विन आणि मध्यमगती उमेश यादवने प्रभावी मारा केला.
मात्र विक (खेळत आहे 63) आणि डग ब्रासवेलने (खेळत आहे 30) सातव्या विकेटसाठी 82 धावांची नाबाद भागीदारी करत न्यूझीलंडला पहिल्या दिवसअखेर सहा बाद 328 धावांपर्यंत पोहोचवताना भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले.
भारतातर्फे लेगस्पिनर ओझा सर्वात यशस्वी ठरला. त्याने 90 धावांत चार विकेट्स घेतल्या. पहिल्या कसोटीत 12 विकेट्स मिळवणारा ऑफस्पिनर अश्विन केवळ एकच विजय मिळवू शकला. डावखुरा मध्यमगती झहीरने प्रत्येकी एक विकेट मिळवली. भारताचे क्षेत्ररक्षण खराब झाले. विराट कोहलीने गप्टिलला जीवदान दिले. ओझाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये उडालेला झेल त्याला टिपता आला नाही. वास्तविक पाहता तिस-या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सुरेश रैनाला हा झेल टिपता आला. मात्र कोहलीने त्याचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. परिणामी त्याचा प्रयत्न फसला.