जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नावगॉन सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी सुरक्षारक्षकां बरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नावगॉन सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी सुरक्षारक्षकां बरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. सर्तक असलेल्या सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला.
कुपवाडासह जम्मू-काश्मीरच्या अठरा विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दुस-या टप्प्याचे मतदान होत असताना हा घुसखोरीचा प्रयत्न झाला. पाच ते आठ सशस्त्र दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे लष्कराने सांगितले.
नावगॉव सेक्टरमध्ये संशयास्पद हालचाली दिसताच, जवानांनी त्या दिशेने हटकले असता, दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरा दाखल जवानांनी केलेल्या गोळीबारत तीन दहशतवादी ठार झाले.
मतदाना दरम्यान घातपात घडवण्याच्या इराद्याने हे दहशतवादी आले होते. आठवडयाभरातील राज्यातील ही तिसरी घटना आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील सीआरपीएफच्या बंकरला लक्ष्य करुन ग्रेनेड हल्ला केला होता.
सोमवारी मतदानाच्या पूर्वसंध्येला नियंत्रण रेषेजवळील मेंढार भागामध्ये आईडीचा स्फोट घडवण्यात आला होता. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक उधळून लावण्यासाठी दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत.