मोकाट फिरणा-या प्राण्यांना ठेवण्यासाठी असलेल्या पालिकेच्या कोंडवाडय़ाच्या जागेवर कोणार्क कंपनीने गाळय़ांचे बांधकाम सुरू केले आहे.
उल्हासनगर – मोकाट फिरणा-या प्राण्यांना ठेवण्यासाठी असलेल्या पालिकेच्या कोंडवाडय़ाच्या जागेवर कोणार्क कंपनीने गाळय़ांचे बांधकाम सुरू केले आहे. याविरोधात पालिका नगरसेवकांनी महासभेत गदारोळ घातल्यानंतरही कारवाई केली जात नसल्याने पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उल्हासनगर पालिका मुख्यालयाच्या मागच्या बाजूला महापालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे. रस्त्यावर फिरणा-या मोकाट जनावरांमुळे शहरात वाहतूक कोंडी व्हायची. ही वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी मोकाट जनावरांसाठी १९९४मध्ये पालिकेने मध्यवर्ती जकात कार्यालयाच्या बाजूला हा कोंडवाडा उभारला होता. शहरात असलेली डुकरांची समस्या पुरती सुटल्यानंतर हा कोंडवाडा दुर्लक्षित आहे.
दरम्यानच्या काळात उल्हासनगरातील कचरा उचलणा-या कोणार्क इन्वायरो कंपनीला गॅरेज आणि गाडय़ा उभ्या करण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती जकात नाक्याची जागा देण्यात आली. यामुळे दुर्लक्षित असलेल्या कोंडवाडय़ाच्या जागेवर कोणार्क कंपनीच्या भागीदाराची नजर पडली.
मागील पंधरावडय़ापासून या जागेवर बेकायदा बांधकाम सुरू आहे. याबाबत मागील महासभेत स्थानिक नगरसेवक अंकुश म्हस्के यांनी बेकायदा कोंडवाडय़ाच्या जागेवर होत असलेल्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर हे बांधकाम चार दिवसांत काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी बांधकामाच्या ठिकाणी भेटही दिली होती, मात्र आठवडा उलटून गेल्यानंतरही कारवाई झालेली नाही.
याबाबत नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवक अंकुश म्हस्के, सुनील सुर्वे यांनी कोंडवाडय़ाच्या जागेवर सुरू असलेल्या बांधकामाचा प्रश्न उचलून धरला. या जागेवर वृक्षतोड झाल्याने बेकायदा वृक्षतोड आणि एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. याबाबत प्रभाग समिती-३चे सहायक आयुक्त युवराज भदाणे यांनी बांधकाम थांबवण्यात आले आहे, लवकरच निष्कासित केले जाईल, असे आश्वासन नगरसेवकांना दिले आहे.