कल्याण-डोंबिवली महापालिकेत यापुढे महासभा असताना फक्त नगरसेवकांनाच महापालिका भवनात प्रवेश मिळणार आह
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेत यापुढे महासभा असताना फक्त नगरसेवकांनाच महापालिका भवनात प्रवेश मिळणार आहे. त्यांच्यासह असणारे कार्यकर्ते, बॉडीगार्ड, महिला नगरसेवकांचे पती यांना प्रवेश देण्यास आयुक्त ई. रवींद्रन यांनी मज्जाव केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी पार पडलेल्या केडीएमसीच्या महासभेवेळी या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. नगरसेवकांचे खाजगी अंगरक्षक, कार्यकर्ते, पती यांना पोलिसांच्या मदतीने अडविण्यात आले आहे. त्यामुळे नेहमी बॉडीगार्ड व कार्यकर्त्यांच्या गराडय़ात फिरणारे अनेक ‘साहेब’ व ‘शेठ’ आज मात्र एकटेच महापालिकेत गेले. यंदाच्या २७ गावांतील नगरसेवकांमुळे सदस्यसंख्या वाढली असून मनी, मसल पॉवर वापरणा-या अनेकांनी महापालिकेच्या सभागृहाचे नियमही पायदळी तुडवले आहेत.
त्यामुळे महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या या भूमिकेला महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही पाठबळ दिले. त्यामुहे शिवसेनेच्या काही दबंग नगरसेवकांची नाराजी सभागृहात उमटली. नगरसेवक आपल्या प्रभागात नागरिकांसाठी मनमोकळे फिरले पाहिजेत, बॉडीगार्डच्या गराडय़ात फिरल्याने सामान्य नागरिकांच्या समस्या कशा सुटतील? असे माजी महापौर वैजयंती घोलप यांनी विचारले. त्यावर त्यांच्याच पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक महेश गायकवाड यांनी आक्षेप घेत ‘कल्याण-डोंबिवलीचे अंबरनाथ करायचे आहे का?’ असा प्रश्न केला.
तर या नव्या निर्णयामुळे काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे यांनाही महापालिकेत प्रवेश नाकारण्यात आला. सचिन पोटे यांची पत्नी जान्हवी या नगरसेविका असून ते त्यांच्यासह महापालिकेत आले होते. मात्र सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारल्याने संतापलेल्या पोटे यांनी नाराजी केली. तर या नियमामुळे नाराज झालेल्या काही नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्यालयात फौजफाटा घेऊन येणा-या पालकमंत्र्यांनाही हाच नियम लावला पाहिजे, अशी मागणी केली आहे.