ब्रिस्बेनमधील दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी ड्रेसिंगरूममध्ये शाब्दिक चमकम उडाली तरी विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यात कुठलेही मतभेद नसल्याचा खुलासा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने तिस-या कसोटीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी केला.
मेलबर्न– ब्रिस्बेनमधील दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी ड्रेसिंगरूममध्ये शाब्दिक चमकम उडाली तरी विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यात कुठलेही मतभेद नसल्याचा खुलासा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने तिस-या कसोटीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी केला.
‘‘त्यावेळी जे काही घडले, त्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये थोडी अस्वस्थता होती. परंतु, रंगवून सांगितलेले पूर्णपणे निराधार आहे. ‘झाले गेले विसरून’ धवन आणि कोहलीने दुस-या दिवशी सरावावेळी एकमेकांशी संवाद साधला. सद्यस्थितीत क्रिकेटपटूंमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण आहे. मागील दोन कसोटीत संधीचे सोने करण्यात आम्हाला अपयश आले. मात्र ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत मागील चुका सुधारण्याला आमचे प्राधान्य असेल,’’ असे ढोणीने सांगितले.
[poll id=”881″]
भारताची फलंदाजी वाईट झालेली नाही. मात्र फॉर्मात असलेला सलामीवीर मुरली विजय आणि विराट कोहलीने सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.
तसेच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने छोटया खेळींचे मोठया खेळीत रूपांतर करण्याची गरज आहे. तिस-या कसोटीत रोहित शर्माला वगळून सुरेश रैनाला अंतिम संघात स्थान मिळू शकते. अनुभवी इशांत शर्मासह उमेश यादव, मोहम्मद शामी आणि वरुण आरोनने गोलंदाजीचा आनंद लुटला तरी ‘मॅचविनिंग’ कामगिरी करण्यात त्यांना अपयश आलेय. भुवनेश्वर कुमार फिट असला तरी त्याच्या समावेशाबाबतचा अंतिम निर्णय कसोटीपूर्वी घेतला जाईल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने प्रथेप्रमाणे कसोटीच्या एक दिवसआधी अंतिम संघ घोषित केला आहे. ज्यो बर्न्सचे कसोटी पदार्पण नक्की झाले. डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन तंदुरुस्त असून मिचेल स्टार्कच्या जागी रायन हॅरिसचा समावेश करण्यात आला आहे. यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनचेही स्थान कायम आहे.
भारत : महेंद्रसिंग ढोणी (कर्णधार, यष्टिरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमन साहा (राखीव यष्टिरक्षक), आर. अश्विन, करन शर्मा, इशांत शर्मा, मोहम्मद शामी, वरुण आरोन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, ज्यो बर्न्स, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), मिचेल जॉन्सन, रायन हॅरिस, नॅथन लियॉन, जोश हॅझेलवुड.
वेळ : पहाटे ५ वाजल्यापासून. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.