वेस्ट इंडिजमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बलाढय़ संघांचा समावेश असलेली तिरंगी स्पर्धा सुरू आहे, हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल.
मुंबई- वेस्ट इंडिजमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बलाढय़ संघांचा समावेश असलेली तिरंगी स्पर्धा सुरू आहे, हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल. एक तर या स्पर्धेतील सामने रात्री साडेदहा वाजता सुरुवात होतात. पहाटे चारच्या दरम्यान संपतात. शिवाय टेन क्रिकेटच्या टेन ३ चॅनेलवर दिसतात. सामन्याची वेळ आणि चॅनेलचा शोध घेणे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. या तिरंगी स्पर्धेतील तीन सामने संपले. वनडे म्हणजे धावांचा पाऊस समजला जातो. परंतु, पहिल्या तीन सामन्यांत तब्बल ४९ विकेट पडल्या. म्हणजे प्रत्येक सामन्यात १५ गडी गारद झाले.
गयाना राष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर तिन्ही सामने झाले. तिन्ही सामने गोलंदाजांनी गाजवले. एकदिवसीय क्रिकेट हे फलंदाजीला धार्जिणे समजले जाते. मात्र गयाना स्टेडियमची खेळपट्टी बनवणारे (क्युरेटर) माजी गोलंदाज असावेत. त्यांनी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टय़ा बनवल्या आणि वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फे फे उडाली. खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल असली तरी तिन्ही संघांतील गोलंदाजांनी ‘स्टंप टू स्टंप’ मारा केला. ४९पैकी ३१ फलंदाज त्रिफळाचीत किंवा पायचीत (एलबीडल्यू) स्वरूपात बाद झाले. यावरून गोलंदाजांची अचूकता लक्षात येते. चेंडूच्या रेषेत येऊन खेळला नाहीत तर घात झाला म्हणून समजा. आयपीएलमध्ये चमकलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला २ आणि ६ अशा ८ धावा करता आल्या. डेव्हिड वॉर्नरने ५६ धावा केल्या तरी द. आफ्रिकेविरुद्ध तो जेमतेम खाते खोलू शकला. द. आफ्रिकेचा कर्णधार एबी डेविलियर्स ३१+२२ अशा ५३ धावा करू शकला. क्विंटन डी कॉक ४८ (३०+१८), कीरॉन पोलार्डने ६७ (६७+०) धावा केल्या. झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांची फार धुलाई होते. मात्र काही वेळा खेळपट्टय़ा गोलंदाजांना अनुकूल बनवणे आवश्यक आहे. त्यामुळे गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. तिरंगी मालिकेतील गयाना स्टेडियमवरील सामन्यांनंतर तिन्ही संघांतील गोलंदाजांनी क्युरेटर्सना धन्यवाद दिले असतील.
स्पर्धेचा दुसरा टप्पा (पुढील तीन सामने) वॉर्नर पार्क, सेंट किट्स आणि तिसरा टप्पा (अंतिम फेरीसह चार सामने) केन्सिग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बेडोस येथे होईल. तिथे खेळपट्टी कशी असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे.