गुजरात लायन्सनी गतविजेता मुंबई इंडियन्सला सहा विकेट आणि १३ चेंडू राखून आयपीएल-९ मध्ये ‘प्ले ऑफ’ फेरी निश्चित केली.
कानपूर- गुजरात लायन्सनी गतविजेता मुंबई इंडियन्सला सहा विकेट आणि १३ चेंडू राखून आयपीएल-९ मध्ये ‘प्ले ऑफ’ फेरी निश्चित केली. सुरेश रैना आणि सहका-यांनी पदार्पणात अंतिम चार संघात धडक मारण्याची करामत साधली.
शनिवारी झालेली लढत रंगतदार होईल, असे वाटले. मात्र मुंबईने निराशा केल्याने एकतर्फी झाली. गतविजेत्यांचे १७३ धावांचे आव्हान गुजरातने १७.५ षटकांत चार विकेटच्या बदल्यात पार केले. त्याचे श्रेय कर्णधार रैनासह ब्रेंडन मॅककलम तसेच ड्वायेन स्मिथला जाते.
रैनाने ३६ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. मॅककलमने २७ चेंडूंत ४८ धावा फटकावताना ८ चौकार आणि एक षटकार खेचला. स्मिथने २३ चेंडूंत नाबाद ३७ धावा काढल्या. त्यात ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. रवींद्र जडेजाने १५ चेंडूंत नाबाद २१ धावा काढल्या.
गुजरातच्या विजयात फलंदाजांनी छाप पाडली तरी गोलंदाजांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमार, धवल कुलकर्णी, ड्वायेन स्मिथ आणि ड्वायेन ब्राव्होने प्रत्येकी दोन विकेट घेत मुंबई ८ बाद १७२ धावांत रोखले. शेवटच्या सहा षटकांत अचूक आणि नियंत्रित मारा करताना लायन्सच्या गोलंदाजांनी मुंबईच्या १५-२० धावा रोखल्या. त्याच निर्णायक ठरल्या.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी घालण्यात आल्याने नवव्या आणि दहाव्या मोसमासाठी गुजरात लायन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे नवे संघ आले. त्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील पुण्याने निराशा केली. मात्र सुरेश रैनाने आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपद भूषवताना गुजरात लायन्सला पदार्पणात ‘प्ले ऑफ’ फेरी गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला.