गावच्या ग्राम सभेमध्ये विकास योजनांवरुन जाब विचारणा-या मागासवर्गीय महिलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बीड – गावच्या ग्राम सभेमध्ये पंचायत सदस्यांना विकास योजनांवरुन जाब विचारणा-या मागासवर्गीय महिलांना बेदम मारहाण करुन, त्यांच्या डोळयात मिरचीपूड टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
केज तालुक्यातील वाघे-बांभूळ गावमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौदा जणांना अटक केली असून, अॅट्रोसिटी कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात ग्रामसभा सुरु असताना, या मागासवर्गीय महिलांनी पंचायत सदस्यांना आमच्यासाठी कुठल्या विकास योजना राबवल्या असा जाब विचारला.
याच राग येऊन, या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांच्या डोळयात मिरचीपूड टाकून त्यांना गावातील मंदिरात बंद करुन ठेवण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. या प्रकरणी डीवायएसपी अमय डोंगरे अधिक तपास करत आहेत.