देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने ग्रामीण भागातील गृहकर्जे घेऊ इच्छिणा-यांसाठी सोमवारी खुशखबर दिली.
मुंबई- देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने ग्रामीण भागातील गृहकर्जे घेऊ इच्छिणा-यांसाठी सोमवारी खुशखबर दिली.
बँकेने ग्रामीण भागात घरखरेदी, बांधणी आणि नूतनीकरणासाठी ९.७० टक्के आधार कर्जदरात १५ लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्याची घोषणा केली. याबरोबरच ग्रामीण भागातील व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत बँकेने दिले आहेत.
आयसीआयसीआय बँकेची नजीकची प्रतिस्पर्धी असलेल्या भारतीय स्टेट बँकेने जवळपास याच दरात महिला ग्राहकांना गृहकर्ज देऊ केले आहे.
समाजातील मोठया प्रमाणावरील घटकाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी आयसीआयसीआय बँक बांधील असल्याचे कार्यकारी संचालक राजीव सभरवाल यांनी नमूद केले आहे.
बँकेच्या ४०५२पैकी १८९ शाखांमध्ये हे ग्रामीण गृहकर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.