सध्या जवळपास प्रत्येक घरामध्ये फिशटँक दिसतो. फिशटँक (अक्वेरियम) ठेवण्यामागे केवळ मनोरंजन हा उद्देश नसून त्यामागे फेंगशुई शास्त्रही आहे. फिशटँकमुळे घरातील वातावरण आनंदी राहते. संकटे दूर होतात. घरात सुख आणि समृद्धी नांदते. मात्र फिशटँक कसा ठेवावा. तसेच काय काळजी घ्यावी, यासाठी काही नियम आहेत. फेंगशुई पद्धतीच्या या नियमांचे पालन केल्यास तुमचे जीवन अधिक समृद्ध होण्यास मदत होते.
फेंगशुई शास्त्रानुसार, फिशटँक हा पूर्व, उत्तर दिशेला किंवा पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये ठेवल्यास वास्तूसाठी लाभदायक ठरतो. दाम्पत्यांमधील प्रेम आणि स्नेह कायम राखण्यासाठी फिशटँक हा मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवावा. उजव्या बाजूला ठेवल्यास घरातील पुरुषांचा स्वभाव चंचल बनतो. फिशटँक हा स्वयंपाकघर (किचन) किंवा झोपण्याच्या खोलीमध्ये (बेडरूम) ठेऊ नये. या ठिकाणी फिशटँक ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे गृहकलह होण्याची शक्यता बळावते.
फिशटँकमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरण्यास मदत होते. मात्र त्याची तितकीच काळजीही घेण्याची आवश्यकता आहे. टँकमधील पाणी विशिष्ठ कालावधीनंतर बदलण्याची आवश्यकता आहे. टँकमधील माशांची संख्या नऊ असावी. त्यात लाल आणि सोनेरी रंगाच्या आठ तसेच काळय़ा रंगाच्या एका माशाचा समावेश असावा. फेंगशुई पद्धतीनुसार, काळय़ा रंगाच्या मासळीमुळे घरावर कुठलेही संकट येत नाही.
फिशटँकमधील मासे अधिक काळ जगत नाहीत. ठरावीक कालावधीनंतर मासे मरण पावतात. मृत मासे फार काळ टँकमध्ये ठेऊ नयेत. ते काढून गटार किंवा नाल्यामध्ये न फेकता तलाव किंवा नदीमध्ये टाकावेत. फेंगशुईनुसार, कुठलाही मासा मरतो तेव्हा त्याच्यासोबत तो त्या त्या घरातील संकटे. आपत्ती घेऊन जातो. त्यामुळे माशाची योग्य विल्हेवाट लावणे केव्हाही चांगले.