श्रीनगर – काश्मीरमध्ये सलग दुस-या दिवशी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला; परंतु हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला असून, जवानांच्या गोळीबारात आणखी एक दहशतवादी ठार झाला आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणा-या ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
काल शनिवारी कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणा-या तीन दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला होता. रविवारी पुन्हा घुसखोरी करणा-या एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे, अशी माहिती रविवारच्या कारवाईनंतर भारतीय लष्करचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
कुपवाडाच्या हंदवाडामध्ये स्थानिक पोलीस आणि ३० राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला मदत करणा-या दोन जणांना अटक केली आहे. काश्मीरमधील अनेक भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.