दहावी आयसीसी चँपियन्स ट्रॉफी कोण जिंकेल, याचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही. सुरुवातीला पावसामुळे आणि त्यानंतर चुरशीच्या खेळामुळे रंगत वाढली. त्यामुळेच निम्मी स्पर्धा संपली तरी उपांत्य लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चँपियन्स ट्रॉफी स्पर्धेतील निम्मे म्हणजे आठ सामने संपलेत. सहभागी आठ संघांपैकी प्रत्येक संघ किमान दोन सामने खेळलाय. त्यात एकटा इंग्लंड संघ सलग दोन सामने जिंकू शकला आहे. यजमान संघ सर्वाधिक चार गुणांसह ‘अ’ गटात आघाडीवर आहे. त्यानंतर उर्वरित सातपैकी पाच संघांच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण आहे. अन्य दोन संघांना केवळ खाते उघडता आले आहे. म्हणून त्यांच्या नावे प्रत्येकी एक गुण आहे. इंग्लंडने बांगलादेशला हरवत उपांत्य फेरी निश्चित केली आहे. यंदाच्या स्पर्धेत ‘सेमीफायनल’मध्ये धडक मारणारा तो पहिला संघ आहे. मात्र अन्य तीन संघांचे काय? या तीन संघांसाठी उर्वरित सात संघांत चुरस आहे.
इंग्लंडमध्ये पावसाळा सुरू आहे. मोठा पाऊस नसला तरी अधूनमधून पाऊस येतो आणि खेळाची समीकरणे बिघडवतो. पहिल्या आठपैकी पाच लढतींना पावसाचा फटका बसला. त्यातील दोन सामने पावसामुळे रद्द झाले. तीन सामन्यांत डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारे विजेता ठरवण्यात आला. पावसाचा सर्वाधिक फटका माजी विजेता ऑस्ट्रेलियाला बसला. पहिल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे त्यांना पराभव टाळता आला. मात्र दुस-या लढतीत बांगलादेशविरुद्ध पावसाने विजय हिरावला. परिणामी ऑस्ट्रेलिया संघ चिंतेत सापडला आहे. दोन सामन्यांत दोन गुणांसह ते ‘अ’ गटात दुस-या स्थानी आहे. यजमान इंग्लंडनंतर केवळ कांगारूच अपराजित आहेत. याच गटात बांगलादेश आणि न्यूझीलंडने प्रत्येकी एका गुणासह अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान राखले आहे. ‘अ’ गटात आता बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा लढती शिल्लक आहेत. या लढती निकाली निघतील, अशी अपेक्षा करूया. बांगलादेश वि. न्यूझीलंड लढतीतील विजेत्या संघाचे भवितव्य इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया लढतीवर अवलंबून राहील.
यजमानांनी सातत्य राखताना सलग तिसरा विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलिया बाहेर होईल. मात्र ऑस्ट्रेलियाने खेळ उंचावला तर ते थेट उपांत्य फेरी गाठतील. ‘अ’ गटाच्या तुलनेत ‘ब’ गटातील सामन्यांना पावसाचा कमी फटका बसला. म्हणजे पाऊस आला तरी दोन्ही डावांत किमान वीस षटकांचा खेळ झाल्याने सामने निकाली काढता आले. भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील लढतीत पावसाने ‘खो’ घातला तरी भारताच्या मोठय़ा धावसंख्येसमोर पाकिस्तानचे काहीच चालले नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच पावसाने पाकिस्तानला तारले. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या लढतीत श्रीलंकेला हरवले. मात्र भारताविरुद्ध त्यांनी खेळ उंचावला. श्रीलंकेच्या विजयाने ‘ब’ गटातील प्रत्येक संघाच्या नावे विजयाची नोंद झाली. एकेका विजयासह पराभवही पाहावा लागल्यामुळे चारही संघांचे दोन लढतींमधून प्रत्येकी दोन गुण झालेत. ‘अ’ गटात एका स्थानासाठी तीन संघांत चुरस आहे. ‘ब’ गटात दोन स्थानांसाठी चार संघांत स्पर्धा आहे.
भारत वि. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान वि. श्रीलंका या लढतींच्या निकालावर गटातील दोन अव्वल संघांचे भवितव्य अवलंबून आहे. अर्थात पावसाचा व्यत्यय आला नाही तर ठीक. नाहीतर पुन्हा गोंधळ. सद्य:स्थितीत चारही संघांचे प्रत्येकी दोन गुण असले तरी सरस धावगतीवर गतविजेता भारत अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तानचा त्यानंतर नंबर लागतो. ‘अ’ गटाच्या तुलनेत ‘ब’ गटात अपयशी सलामीनंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचा उंचावलेला खेळ चुरस वाढण्यास कारणीभूत ठरला. भारताविरुद्ध पाकिस्तान संघाने कच खाल्ली. एकतर्फी पराभवामुळे पाकिस्तानचे चाहतेही निराश झाले. मात्र पाकिस्तानचे नशीब बलवत्तर म्हणायला हवे. आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचे नशीब फळफळले. गोलंदाजांची कामगिरी आणि पावसाचे योग्य वेळी झालेले आगमन त्यांना खाते उघडण्यास पुरेसे ठरले. पाकिस्तानला चँपियन्स ट्रॉफीतील सलग सहा पराभवांची मालिका खंडित करण्यास यश आले. तब्बल आठ वर्षानंतर पाकिस्तानला चँपियन्स ट्रॉफीत विजय पाहायला मिळाला. पाकिस्तानप्रमाणे श्रीलंकेलाही उशिरा पण योग्य वेळी सूर गवसला. माजी विजेत्यांना गतविजेता भारताला हरवण्याची करामत साधली. त्यांनी विक्रमी धावांचा पाठलाग केला. उशिरा सूर गवसलेले श्रीलंका आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. त्यावेळी उभय संघांचा खरा कस लागेल.
पावसाचा खोडा आणि त्यानंतर वाढलेली चुरस पाहता उपांत्य फेरीतील उर्वरित तीन संघांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे, तितके सोपे नाही. गतविजेत्या इंग्लंडने स्थान नक्की केले. त्यानंतर गतविजेता भारत, माजी विजेता ऑस्ट्रेलिया तसेच श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानपैकी एक असे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मात्र सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होण्यासाठी शेवटच्या म्हणजे ‘अ’ गटातील इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया आणि ‘ब’ गटातील पाकिस्तान वि. श्रीलंका लढतींच्या निकालापर्यंत थांबावे लागेल.