पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही भूकंपाचे धक्के बसत असल्याचे एका ताज्या अभ्यासात दिसून आले आहे.
नवी दिल्ली – पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही भूकंपाचे धक्के बसत असल्याचे एका ताज्या अभ्यासात दिसून आले आहे. भारताच्या ‘चांद्रयान-१’ या यानाने पाठविलेल्या छायाचित्रांचा वैज्ञानिकांनी अभ्यास केल्यानंतर पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या पृष्ठभागावरही टेक्टॉनिक प्लेट असल्याचे त्यांना आढळून आले आहे. याच टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वीवर भूकंप होत असतो. त्यामुळे चंद्रवरील भूकंपांनाही याच टेक्टॉनिक प्लेट्च्या हालचाली कारणीभूत असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान विभागाच्या भूगर्भशास्त्र व सुदूर संवेदन विभागाचे प्राध्यापक सौमित्र मुखर्जी यांनी ही माहिती दिली. त्यांचे विद्यार्थी असलेले प्रियदर्शनी सिंग यांनीही या अभ्यासात मोलाचे योगदान दिले आहे. ‘चांद्रयान-१’ यानावर बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील छायाचित्रे काढून प्रकल्प केंद्राकडे पाठविली. यातील चंद्राच्या दक्षिण धृवीय भागातील जी छायाचित्रांमध्ये चंद्राच्या भूगर्भातही टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली सातत्याने सुरू असल्याचे आढळून आले आहे.
पृथ्वीच्या भूगर्भातील विशिष्ट आवरणाच्या थरात होत असलेल्या हालचाली पृथ्वीवरील भूकंपांसाठी कारणीभूत ठरत असतात. तर चंद्राच्या पृष्ठभागात काही द्रवरूप स्वरूपाचे घटक असून या घटकांच्या प्रभावाने तिथे टेक्टॉनिक प्लेट्च्या हालचाली होतात आणि भूकंपाचे धक्के बसतात. चंद्राच्याही पृष्ठभागाची रचना पृथ्वीप्रमाणेच असून त्यामुळे चंद्र आणि पृथ्वीवरील भूकंपांचा तुलनात्मक अभ्यास करणेही शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत भूकंपाचे भाकीत वर्तवणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींचा तसेच चंद्रावर भविष्यात होणा-या भूकंपांचा अभ्यास करून त्याचा पृथ्वीवरील भूकंपाशी संबंध जोडला जाऊ शकणार आहे. या माध्यमातून पृथ्वीवर बसणा-या भूकंपांच्या धक्क्यांचे भाकीत करणेही शक्य होणार आहे, असेही प्राध्यापक सौमित्र मुखर्जी यांनी सांगितले आहे.