जगभरात वेगाने वाढणा-या अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि भारतात हि-याच्या दागिन्यांचे आकर्षण वाढत आहे.
मुंबई- जगभरात वेगाने वाढणा-या अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि भारतात हि-याच्या दागिन्यांचे आकर्षण वाढत आहे. या देशांमध्ये मध्यम वर्गाचा वाढता टक्का हिरे व्यापारासाठी मोठा आधार ठरत आहे. हि-यांच्या दागिन्यांची मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणाही या व्यापाराला बळ देणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर २०१३मध्ये हि-यांच्या मागणीने विक्रमी स्तर गाठत जगभरातील ही बाजारपेठ ७९ अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. एकूणच परिस्थिती पाहता ही वाढ भविष्यात दीर्घकाळ सुरू राहणार असली तरी त्यासाठी हिरे उत्पादन, तंत्रज्ञान, बँड्रिंग, विपणन आणि किरकोळ विक्री यामध्ये लक्षणीय गुंतवणुकीची आवश्यकताही यात व्यक्त करण्यात आली आहे.
पालिश (पैलूदार) हि-यांच्या मागणीमध्ये अमेरिकेत गेल्या वर्षी सात टक्क्यांची वाढ झाली. तर चीन आणि भारतामध्ये हि-यांच्या दागिन्यांच्या देशांतर्गत बाजारपेठेत २००८-२०१३ या कालावधीत स्थानिक चलनानुसार वार्षिक १२ टक्के चक्रवाढ नोंदली गेल्याचे डी बीअर्स या जगातील आघाडीची हिरे कंपनीने ‘डायमंड्स इन्साइड’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. जगभरात हि-यांचे विशेष आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र भविष्यात मागणीचा स्तर गृहीत धरून चालणार नसल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
या व्यवसायाला इतर मौल्यवान वस्तूंच्या कडव्या स्पध्रेचा सामना करावा लागत असून अमेरिकन बाजारपेठेत जाहिरातींमधील हि-यांचा कमी झालेला हिस्सा हा याकडेच इशारा करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
२०१३ या वर्षाबाबत हिरे उत्पादनाचा आढावा घेतला असता आधीच्या वर्षाच्या तुलनेत कॅरेटनुसार उत्पादन ७ टक्क्यांनी वाढले असून एकूण १४.५ कोटी कॅरेट उत्पादन झाले. २००५मध्ये हि-यांचे सर्वाधिक १७.५ कोटी कॅरेट उत्पादन झाले होते, अशी माहितीही यात देण्यात आली आहे. याबरोबरच सध्या ज्या स्त्रोतांकडून पुरवठा केला जात आहे, त्यातील संभाव्य घट ही येत्या वर्षातील नवीन उत्पादनाइतकी असणार नाही. २०२०नंतर पुरवठयामध्ये घट होण्यास सुरुवात होईल. त्याआधीच्या पाच वर्षात ही पातळी समसमान राहील असेही यात नमूद करण्यात आले आहे.
‘डायमंड्स इन्साइड’मधील मुद्दे
>हि-यांच्या दागिन्यांच्या विक्रीमध्ये चीन ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे.
>२०१०-२०१३ या कालावधीत चीनमधील हि-यांच्या दागिन्यांची किरकोळ विक्री जवळपास ३० टक्क्यांनी वाढली.
>हि-यांच्या ऑनलाइन खरेदीत वाढ होत आहे. २०१३मध्ये अमेरिकेत हि-यांच्या दागिन्यांच्या सहा खरेदींपैकी एक ऑनलाइन खरेदीदार होता. तर चीनमध्ये एक-चतुर्थाशपेक्षा जास्त लोक हिरे खरेदीपूर्वी संशोधनासाठी इंटरनेटचा वापर करतात.
>गेल्या वर्षी हिरे उत्पादक देशांच्या एकंदरित आर्थिक कामगिरीत हि-यांचे योगदान सर्वात जास्त राहिले आहे. बोटस्वानामध्ये हि-यांचा एकूण देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा २५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि निर्यातीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर नामिबियामध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनातील हि-यांचा हिस्सा ८ टक्के आणि निर्यातीतील हिस्सा २० टक्के एवढा आहे.
मागणी आणि पुरवठयातील आव्हाने
हि-यांच्या मागणीत २०१३-२०१७ या कालावधीत वर्षागणिक ११ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्याच वेळी पुरवठयाच्या पातळीवर या उद्योगाला मोठया आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जुन्या हिरे खाणींचे आयुष्य संपत आल्याने उत्पादनात घट होत आहे. यामुळे भूगर्भात खोलवर संशोधन वाढवले जात असले तरी त्यात वाया जाणारा वेळ आणि तांत्रिक अडचणींचा उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठयात मात्र वर्षागणिक ५.२ टक्केच वाढ अपेक्षित असल्याचे गोल्डमन साक्सने आपल्या एका पूर्वप्रकाशित अहवालात म्हटले आहे.
हि-यांचा शोध ठरतोय महागडा
हि-यांची शोधप्रक्रिया ही दिवसेंदिवस अधिक किचकट आणि तेवढीच महागडी ठरत आहे. खाण क्षेत्रात भूगर्भात जास्तीत जास्त खोलवर जाऊन तसेच दुर्गम भागात हि-यांचा शोध घ्यावा लागत आहे. याचा परिणाम म्हणजे गेल्या संपूर्ण दशकात हिरे उत्पादक देशांमध्ये कामगार, वीज व इंधन या तीन प्रमुख खर्चाची मात्रा स्थानिक महागाई स्तरापेक्षा जास्त प्रमाणात वाढत असून ती भविष्यातही कायम राहण्याची शक्यता असल्याने या उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.