वेस्ट ब्रॉमविच अल्बियनचा १-० पराभव करत आर्सेनल रविवारी सलग १७व्यांदा चॅँपियन्स लीगसाठी (३७ सामन्यांत ७६ गुण) पात्र ठरला.
लंडन – वेस्ट ब्रॉमविच अल्बियनचा १-० पराभव करत आर्सेनल रविवारी सलग १७व्यांदा चॅँपियन्स लीगसाठी (३७ सामन्यांत ७६ गुण) पात्र ठरला. या विजयासोबतच आर्सेनलने हंगामातील घरच्या मैदानावरील शेवटही गोड केला. ऑलिवियर गिरुडने १४व्या मिनिटाला केलेला गोल आर्सेनलला विजय मिळवून देणारा ठरला.
सॅँटी काझरेलाकडून मिळालेल्या पासवर गिरुडने हेडरद्वारे गोल केला. गिरुडचा हा ईपीएल हंगामातील १६वा गोल ठरला. तसेच गेल्या चार ईपीएल सामन्यांतील तिसरा गोल ठरला. वेस्ट ब्रॉमविचविरुद्ध आर्सेनल एकापेक्षा अधिक गोल करणे अपेक्षित
होते. मात्र दुस-या सत्रात पाहुण्यांनी चांगला बचाव केल्याने आर्सेनलला आणखी गोल करता आले नाहीत. मात्र या पराभवामुळे वेस्ट ब्रॉमविच अल्बियनचा ‘रेलिगेशन’चा धोका कायम आहे.
गेल्या महिन्यात एव्हर्टनकडून झालेल्या पराभवानंतर आर्सेनल चॅँपियन्स लीगसाठी पात्र ठरेल का, याबाबत शंका होती. कारण त्यासाठी त्यांची एव्हर्टनशीच स्पर्धा होती. मात्र त्यानंतर येथील लढतीसह ईपीएलमधील सलग चारही सामने जिंकत आर्सेनलने फॉर्म मिळवला. त्यातच एव्हर्टनचा शनिवारी सिटीकडून पराभव झाल्याने चौथ्या स्थानासह आर्सेनलचा चॅँपियन्स लीगसाठी पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला.