मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून खोपोली हाळफाटा ते कर्जत या राज्यमार्ग रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. हा रस्ताहीअवघ्या सहा महिन्यात खड्डेमय झाला असून त्या रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
नेरळ- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून खोपोली हाळफाटा ते कर्जत या राज्यमार्ग रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. चौपदरीकरणाचे काम मंजूर असतांना अर्धा रस्ताही चौपदरी झाला नाही. या संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण न करता रस्त्याचे केवळ डांबरीकरण करून घेतले. दरम्यान, हा रस्ताहीअवघ्या सहा महिन्यात खड्डेमय झाला असून त्या रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नवी मुंबई प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी परिसरातील रस्ते चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला खोपोली येथे कल्याणकरता राज्यमार्गचे चौपदरीकरण मंजूर झाले. खोपोली हाळ फाटा ते कर्जत अशा १७ किलोमीटरचा रस्त्याचे चौपदरीकरण काम त्यात अंतर्भूत करण्यात आले होते.
त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद प्राधिकरणने केली होती. मात्र या राज्यमार्ग रस्त्याचे चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने पूर्ण केले नाही. प्रत्यक्ष अर्धवट भागात चौपदरीकरण करून उरलेल्या रस्त्यावर डांबरी थर लावून रस्ता रुंदीकरण काम पूर्ण झाल्याचा दाखला मुंबई महानगर विकास प्राधिकरणने ठेकेदार कंपनीला दिला. हा प्रकार समोर आला असताना मे २०१५ पर्यंत ठेकेदार कंपनीने रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करून दिले. मात्र चार ते पाच महिन्यात रस्ता खराब झाला आहे.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे करते काय? एखादे काम निकृष्ट दर्जाचे झाले की ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करणारे प्राधिकरण रस्त्याच्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असताना गप्प का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कामाची निविदा चौपदरीकरण कामाची असताना निविदेप्रमाणे कामे न करणा-या ठेकेदारावर काय कारवाई होणार असा प्रश्न आहे.