जपानमध्ये शनिवारी पुन्हा एकदा ७.४ रिश्टर स्केलचा तीव्र धक्का बसला. यात ३५ जणांचा मृत्यू झाला असून ४० हजार नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.
टोकियो- जपानमध्ये शनिवारी पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल एवढी होती. अवघ्या २४ तासांच्या अंतराने पून्हा याच कुमामोतोमध्ये झालेल्या या भूकंपात ३५ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचे केंद्र कुमामोतोमध्ये जमिनीपासून खाली ७ कि. मी. अंतरावर होते.
अनेक जण मातीच्या ढिगा-याखाली जिवंत गाडले गेले असून आणखी भूकंपाची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भूकंपामुळे घरे, रस्ते, इमारती, रेल्वे रूळ सर्व काही होत्याचे नव्हते झाले आहे. पोलीस, हवाई दल आणि सैन्य दलाच्या जवानांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून डोंगराळ भाग असलेल्या कुमांतो शहरानजीक भूस्सखलन झाल्याने रस्ताच गायब झाला आहे.
गुरुवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने काही जुन्या इमारतींचे नुकसान तर नऊ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी याच भूकंपामुळे नवीन इमारतींचेही मोठे नुकसान झाले असून यूटो शहरातील महापालिकेच्या कार्यालयाचाही यात समावेश आहे. भूकंपामुळे ३५ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला सरकारी प्रवक्ते मारिको कुरमित्सू यांनी दुजोरा दिला आहे. या भूकंपात सुमारे १ हजार जण जखमी झाले असून १८४ जण जबर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
जपानमध्ये सलग तीन दिवसात चार वेळा भूकंपाचे मोठे धक्के बसले. गुरूवारी कुमामोतोमध्ये झालेल्या भूकंपात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर अन्य ८०० जण जखमी झाले. ६.५ रिश्टर स्केल क्षमतेचा हा भूकंपाचा धक्का होता. भूकंपाचा केंद्रबिंदू हा सतहपासून १० किमी अंतरावर होता.
त्यानंतर ४० मिनिटांनी आणखी एक ५.७ तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरे जमीनदोस्त होवून वीजपुरवठाही खंडीत झाला. भूकंपग्रस्त भागातून आत्तापर्यंत ४० हजार नागरिकांना स्थलांतरीत केले आहे. नागरिकांना मदत आणि सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, सलग दुस-या दिवशी झालेल्या भूकंपाने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
[EPSB]
जपानमध्ये भूकंपात ८०० जण जखमी
जपानमध्ये भूकंप झाला असून यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य ८०० जण जखमी असल्याचे वृत्त आहे.
[/EPSB]