जमात उद दावा या संघटनेवर बंदी घातलेली नाही. फक्त या संघटनेची बँक खाती गोठवली असून, काही सदस्यांवर निर्बंध आणले आहेत.
नवी दिल्ली – जमात उद दावा या संघटनेवर बंदी घातलेली नाही. फक्त या संघटनेची बँक खाती गोठवली असून, काही सदस्यांवर निर्बंध आणले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे असे पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी शुक्रवारी सांगितले.
संयुक्त राष्ट्राच्या निर्देशांचे आम्ही कठोरपणे पालन करत असून, संघटनेच्या काही सदस्यांना परदेशात जाण्यावर बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्राचे जे निर्देश आहेत त्यानुसार ही कारवाई केली आहे. यापेक्षा जास्त काही करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही असे बासित यांनी सांगितले.
जमात उद दावा मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदची संघटना आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राने या संघटनेवर बंदी घातली होती.
हाफीज सईदच्या अटकेबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बासित म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या ठरावात सईदच्या अटकेचा कुठेही उल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तान सरकारने गुरुवारी जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्क या दोन दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.