वर्ल्डकप जेतेपद पटकवल्यानंतर जर्मनीने गुरुवारी २० वर्षानंतर प्रथमच फिफा अव्वल रॅँकिंग पटकावले.
झ्युरिच (स्वित्झर्लंड)- वर्ल्डकप जेतेपद पटकवल्यानंतर जर्मनीने गुरुवारी २० वर्षानंतर प्रथमच फिफा अव्वल रॅँकिंग पटकावले. १९९४ नंतर जर्मनीला हा मान मिळाला. दुस-या रॅँकिंगवरून जर्मनीने अव्वल स्थानी बाजी मारली. २००८ पासून सातत्याने अव्वल स्थानी असलेल्या स्पेनची थेट आठव्या रॅँकिंगवर घसरण झाली आहे.
वर्ल्डकपमध्ये गटवार साखळीत आव्हान संपलेल्या इंग्लंडची रॅँकिंगमध्ये १० अंकांनी घसरण झाली असून ताज्या क्रमवारीत ते २०व्या स्थानी आहेत. वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अर्जेटिनाने पाचव्या रॅँकिंगवरून दुस-या रॅँकिंगवर झेप घेतली. तिसरा क्रमांक मिळवलेल्या हॉलंडच्या रॅँकिंगमध्ये १२ अंकांची वाढ झाली असून त्यांनी तिसरे स्थान मिळवले.
‘गोल्डन बूट’ विजेता जेम्स रॉड्रिगेझच्या कोलंबियाला चौथे स्थान मिळवता आले. याउलट ब्राझीलच्या रॅँकिंगमध्ये चार अंकांची घसरण झाली असून त्यांना सातव्या समाधान मानावे लागले आहे.
बेल्जियम आणि उरुग्वेने अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान मिळवले. स्वित्झर्लंडलडला नववे आणि फ्रान्सने १०वे रॅँकिंग मिळवत अव्वल १०मधील स्थान टिकवले.
दिलदार ओयझिल
वर्ल्डकप जेतेपदानंतर मिळवलेली घसघशीत रक्कम जर्मनीचा स्टार मेसूत ओयझिलने ब्राझीलमधील २३ गरजू मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी दान केली. त्याच वेळी ब्राझीलमध्ये वर्ल्डकपदरम्यानच्या आदरातिथ्याबद्दलही त्याने आभार मानले. जर्मनीच्या प्रत्येक फुटबॉलपटूला वर्ल्डकप जेतेपदामुळे प्रत्येकी दोन लाख ४० हजार पौंड इतकी रक्कम बक्षिस स्वरूपात मिळाली. सुरुवातीला ११ मुलांच्याच शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देणार असल्याचे ओयझिलने जाहीर केले होते. मात्र वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण संघाला म्हणजेच २३ मुलांना (फुटबॉल संघ २३ जणांचा या अर्थाने) शस्त्रक्रियेसाठी मदत देणार असल्याचे त्याने म्हटले.
अव्वल २० संघ
१. जर्मनी (+१), २. अर्जेटिना (+३), ३. हॉलंड (+१२), ४. कोलंबिया (+४), ५. बेल्जियम (+६), ६. उरुग्वे (+१), ७. ब्राझील (-४), ८. स्पेन (-७), ९. स्वित्झर्लंडलड (-३), १०. फ्रान्स (+७), ११. पोर्तुगाल (-७), १२. चिली (+२), १३. ग्रीस (-१), १४. इटली (-५), १५. अमेरिका (-२), १६. कोस्टारिका (+१२), १७. क्रोएशिया (+१), १८. मेक्सिको (+२), १९. बोस्निया अॅँड हझ्रेगोविना (+२), २०. इंग्लंड (-१०).
(कंसात वाढलेले किंवा कमी झालेले रँकिंग)
भारत १५१व्या स्थानी
भारतीय फुटबॉल संघाला ‘फिफा’ रॅँकिंगमध्ये तीन स्थानांची वाढ झाल्याने त्यांनी १५१वे रॅँकिंग मिळवले आहे. त्यातच मार्चमध्ये बांगलादेशविरुद्ध साधलेल्या बरोबरीनंतर भारत एकही आंतरराष्ट्रीय लढत खेळलेला नाही.